कर्तृत्वाची जाणीव आणि नैतिक जबाबदारी
माणूस अध्यात्माची भाषा सहज बोलतो— अहं ब्रह्मास्मि, मी आत्मा आहे, मी साक्षी आहे असे म्हणतो. पण ही वाक्यं जर केवळ दिलासादायक घोषवाक्यं ठरली, तर त्यांचा उपयोग आत्मोन्नतीऐवजी पलायनासाठीच होतो. आजच्या मंत्रात एक कठोर पण मुक्त करणारा विचार सांगितला आहे— मीच ब्रह्म आहे, मीच ईश्वर आहे. आणि म्हणूनच मी माझ्या प्रत्येक कृत्याला जबाबदार आहे. हा मी म्हणजे मन नव्हे, हा मी म्हणजे इंद्रिये नव्हेत, हा मी म्हणजे बुद्धीही नव्हे— हा मी म्हणजे जिवात्मा. इंद्रिये कृती करतात, मन इच्छा निर्माण करतं, बुद्धी त्याला तर्क देते; पण या सगळ्यांना करून घेणारा जिवात्मा असतो. म्हणूनच नैतिकदृष्ट्या करणाऱ्यापेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार ठरतो. बाह्य जगात आपण हे सहज मान्य करतो. एखाद्याने खून केला, तर खून करणारा दोषी ठरतोच; पण खून करवून घेणारा अधिक गंभीर गुन्हेगार मानला जातो. कारण निर्णय त्याचा असतो— हात दुसऱ्याचा असला तरी बुद्धीमागचा संकेत त्याचा असतो. योगसूत्र हे सत्य थेट सांगतं— कर्ता, करविता आणि अनुमोदन देणारा— हे तिघेही कर्माचे भागीदार आहेत. म्हणजेच फक्त कृती करणं न...