अहंकार आणि आत्मबोध
जसं ऋषींना वाटतं की, अहं ब्रह्मास्मी तसं रावणाला सुद्धा वाटतं. परंतु ऋषींना वाटतं ते सत्य आहे आणि रावणासारख्या उन्मत माणसाला अहं ब्रह्मास्मी वाटतं, तो त्यांचा विकार आहे. अर्थात कित्येकदा अज्ञानापोटी सुद्धा माणसाचा तसा समज झालेला असतो.
याच्यावर एक कथा आहे. एक माणूस होता. तो कुठेतरी ऐकून आला की, 'भगवंत हा सर्वात मोठा आहे. त्याच्या मनात विचार आला की, देवामध्ये सुद्धा महादेव मोठा आहे. म्हणजे तोच भगवंत आहे. तेव्हा दुसऱ्या दिवसापासून त्याने महादेवाची पूजा, अभिषेक अरंभला. असेच दोन चार दिवस गेले. एकदा तो सकाळीच पूजा करण्यासाठी गेला होता. तिथे त्याला दिसलं की, शिवलिंगावर एक उंदीर बसलाय आणि वाहिलेले तांदूळ बिनधास्त खातोय. ते पाहून त्याला वाटलं, देवांचे देव महादेव आहेत, पण महादेवाच्या माथ्यावर साधा उंदीर चढून बसत असेल तर तो महादेवापेक्षा मोठा आहे. दुसऱ्या दिवसापासून त्या उंदराची पूजा त्याने सुरू केली. त्यांचं असं आहे की, भगवंत तर सगळ्यांमध्ये आहे ना! दुसऱ्या दिवसापासून त्याने उंदरावर अभिषेक सुरू केला. तर असेच चार-सहा दिवस झाले. एवढ्यात एक मांजर तिथे आली. तिला घाबरून उंदराने तिथून पळ काढला. तेव्हा मग त्या माणसाने ठरवलं, 'मी महादेवापेक्षा उंदराला मोठा समजत होतो, पण त्या उंदराला मारणारी मांजरच खरंतर मोठी मानली पाहिजे. तेव्हा आता मांजरीतच भगवंत आहे.' पुन्हा काही दिवस गेल्यावर ती मांजर एका कुत्र्याला पाहून पुरती घाबरून गेल्याचं माणसाला दिसतात त्याला वाटायला लागलं, कुत्रा सगळ्यात मोठा. म्हणून त्याने त्या मांजरीला सोडून कुत्र्याची पूजा आरंभली.
कुत्र्याची उपासना साहेब लोक तर करतातच. पोटच्या पोरापेक्षा ते पाळलेल्या कुत्र्याचे लाड कोड पुरवतात. घरात कुत्रा आणताना त्याची आई कोण? बाप कोण? त्याची जात कोणती अशी त्याच्या सात पिढ्यांची माहिती विचारली जाते. अहो घरात सुन आणताना सुद्धा इतका विचार करत नसतील. पण ते लोक कुत्र्या आणि घोड्यांच्या अनुवंशाचा विचार करतात. अर्थात माणसाच्या अनुवंशाबद्दल त्यांना अनास्थाच असते. जाऊ द्या!
जेव्हा त्या माणसाने कुत्र्याची पूजा सुरू केली तेव्हा त्याच्या पत्नीला ते बिलकुल आवडलं नव्हतं. पण ती बिचारी काय बोलणार? नवरा म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: नवऱ्याला सांगणार तरी कशी? तो त्या कुत्र्याची पूजा करत होता, त्याला चांगलं चुंगल खायला घालत होता. पण शेवटी कुत्रा असतो. कुत्र्याची जातच असे की कितीही चांगलं खायला मिळालं तरी तो स्वयंपाक घरात घुसणारच. काही काही लोकांना चोरून खायची खोडंच लागलेली असते. घरात चांगल्यात चांगलं जेवायला मिळत असेल तर तरी म्हणतात की, 'रस्त्यावर उभं राहून खाण्यातच मजा आहे, जी घरी खाण्यात नाही.' माणसाकडे नऊ लाखाचा बंगला असतो, पण त्यात बसून नव्हे तर रस्त्यावर उभे राहून तो खाणार. आता याची सवयच लागलेली आहे त्याला करायचं काय?
एकदा त्या माणसाच्या वडिलांचे श्राद्ध होतं. म्हणून त्याच्या बायकोला बासुंदी बनवली होती. आता सगळं चांगल्यात चांगलं खायला मिळत असून देखील त्या कुत्र्याने बासुंदीच्या पातेल्यात तोंड घातलं. बायकोनी ते बघितलं आणि तिला भयंकर चिड आली. तिने एक सोटा उचलला आणि पटकन त्या कुत्र्याला लगावला. तो कुत्रा लगेच तिथून पळून गेला.
हा सर्व प्रकार तिच्या पतीने पाहिला आणि त्याला वाटलं, 'ओहोहोहो! देवामध्ये देव महादेव, महादेवापेक्षा त्याच्या माथ्यावर चढून बसलेला उंदीर मोठा, तो उंदीर जिला घाबरला ती मांजर मोठी, ती मांजर सुद्धा ज्याला घाबरली तो कुत्रा मोठा आणि त्या कुत्र्याला सुद्धा माझी पत्नी फटकावू शकते म्हणजे तीच ब्रह्म आहे!' दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या पत्नीची पूजा सुरू केली. तिला पाटावर बसून तो गंध- अक्षता फुल वाहू लागला. बिचारा त्याच्या बायकोला याने अगदी गुदमारल्यासारखं होऊ लागलं. पण करणार काय? तिला वाटलं, पतीच्या डोक्यात काय खुळ शिरल आहे! पण या वेड्याला सुधरायचा कसा?
एक दिवस तिने जीवनामध्ये खूप तिखट घातलं. तिचा पती बाहेरून आला आणि जेवायला बसला. बाहेरची ऊन झेलत आलेल्या त्या माणसाचे डोकं आधीच गरम असणार. पहिल्या भातासोबत आमटीचा एक भुरका मारला असेल तोच पाटावरून तो उभा राहिला आणि बायकोच्या मुखात एक ठेवून दिली. पण नंतर त्याचं विचार चक्र सुरू झालं की, पत्नीला मी मोठी मानत होतो, तिची पूजा करत होतो, पण पत्नीपेक्षा मीच मोठा आहे! अहं ब्रह्मास्मीची त्याला जाणीव झाली!
तर अशा प्रकारे अज्ञानाने सुद्धा माणसाला वाटतं की, 'मी ब्रह्म आहे' म्हणूनच सांगत होतो की, जसे रावणी वृत्तीचे लोक उन्मत त्याने स्वतःला भगवंत समजतात तसे काही लोक अज्ञानामुळे सुद्धा स्वतःला भगवंत समजतात. मात्र सचिदानंद स्वरूप ब्रम्हाचे समज काही निराळीच आहे.
निष्कर्ष : अहंकार आणि आत्मबोध यांमधील सूक्ष्म रेषा
या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते—
“मी ब्रह्म आहे” ही जाणीव आणि “मीच सगळ्यात मोठा आहे” हा भ्रम यांत केवळ शब्दांचा फरक नाही, तर चेतनेचा फरक आहे.
ऋषी जेव्हा अहं ब्रह्मास्मी म्हणतो, तेव्हा त्याचा ‘अहं’ वितळलेला असतो.
त्यात देह, बुद्धी, पद, सत्ता किंवा सामर्थ्य यांचा गर्व नसतो.
तो ‘मी’ नसतो—तो साक्षीभाव असतो.
रावण जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो, तेव्हा तो ब्रह्माशी एकरूप होत नाही;
तो ब्रह्मालाच आपल्या अहंकारात कैद करू पाहतो.
म्हणून ते ज्ञान नसून विकार ठरतो.
या कथेतला माणूस देव, उंदीर, मांजर, कुत्रा, पत्नी आणि शेवटी स्वतः—
अशा साखळीने “मोठेपणा” मोजत राहतो.
ही मोजणी बोधाची नाही, तर भीती आणि सामर्थ्याची आहे.
जिथे सामर्थ्य दिसतं, तिथे तो ब्रह्म शोधतो—
पण ब्रह्म सामर्थ्यात नाही, तर समत्वात आहे.
अज्ञानामुळे माणूस स्वतःला ब्रह्म समजू शकतो,
पण त्या समजुतीत करुणा नसेल, विवेक नसेल, आणि नम्रता नसेल
तर तो आत्मबोध नसून आत्मफसवणूक ठरते.
सच्चिदानंद स्वरूप ब्रह्माची ओळख
“मी कुणावर राज्य करतो” यात नाही,
तर
“माझ्या अस्तित्वाने कुणाला भय उरत नाही”
इथे आहे.
आणि हाच फरक आहे—
ऋषी आणि रावणात,
ज्ञान आणि अहंकारात,
आत्मबोध आणि उन्मादात.
Comments
Post a Comment