आत्मसूचना आणि वरसत् आत्मा
हा मंत्र आत्मसूचनात्मक आहे. तो आदेश देत नाही; तो आठवण करून देतो. या मंत्राद्वारे माणसाला बदलता येतं—पण बाहेरून नाही, आतून. आत्मसूचनेतून मस्तीखोर मुलालाही कसं घडवता येतं, हे श्रुती फार सुंदरपणे दाखवते. आपण सगळेच आपल्या मुलांना सुधारू पाहतो; पण प्रश्न असतो—कशा प्रकारे? मी नेहमी एक उदाहरण देतो. समजा एखादा मुलगा आईचं फारसं ऐकत नाही. अशा वेळी घरी पाहुणे आले आहेत आणि त्यांना लिंबाचं सरबत द्यायचं आहे. खाली जाऊन लिंबं आणायची आहेत. आईला माहीत असतं की, मुलाला थेट सांगितलं तर तो लगेच ‘नाही’ म्हणेल. मग ती काय करते? ती त्या मुलाच्या समोरच पाहुण्यांना म्हणते, “माझा मुलगा इतका शहाणा आहे की तो आत्ताच खाली जाईल आणि लिंबं घेऊन येईल.” हे ऐकताच तो मुलगा धावत खाली जातो आणि लिंबं घेऊन येतो. हा प्रकार आदेशाचा नाही; तो आत्मसूचनेचा आहे. माणसातल्या श्रेष्ठतेला साद घातली की, माणूस स्वतःहून बदलतो. श्रुतीही नेमकं हेच करते. जीवाला खाली दाबत नाही, तर वर उचलते. आत्म्याचं उन्नतीकरण हाच तिचा हेतू आहे. म्हणूनच या मंत्रात आत्म्याला अनेक विशेषणांनी संबोधलं आहे— हंसः, शुचिषद्, वसु:, अन्तरिक्षसत्, हो...