जबाबदारी कोणाची? — मन, इंद्रिये की जिवात्मा?
जेवताना माणसाच्या मनात असा भाव असला पाहिजे की मी हंसः आहे, मी प्राण आहे, मी मुख्य आहे.
कोणतीही कृती घडते तेव्हा मन, बुद्धी आणि इंद्रिये ही साधनं असतात; पण त्या कृतीचा करवणारा अहंयुक्त जिवात्माच असतो. म्हणूनच जबाबदारी ढकलून देण्याची सवय उपनिषद् मान्य करत नाही. उपनिषद् स्पष्ट सांगते—खरी जबाबदारी जिवात्म्याचीच आहे.
आपण बहुतेक वेळा काय करतो?
चूक झाली की म्हणतो—
“मन वाईट आहे”, “इंद्रियांनी ओढलं”, “बुद्धी चालली नाही”
आणि स्वतःला मोकळं करून घेतो.
पण ही पळवाट आहे; सत्य नव्हे.
चार व्यापारी आणि मांजराची गोष्ट
चार व्यापारी होते. कापसाचा व्यवसाय करणारे. एकत्र मिळून त्यांनी गोडाऊन भाड्याने घेतलं होतं. उंदरांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी एक मांजर पाळली. मांजराला चार पाय—म्हणजे चार भागीदार!
हौसेपोटी नाही, तर व्यवहारबुद्धीने त्यांनी मांजर पाळली होती.
तरीही गंमत अशी की, त्यांनी मांजरीचे चारही पाय आपापसांत वाटून घेतले होते.
प्रत्येक जण आपल्या वाट्याच्या पायाला वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांनी सजवत असे.
मांजर धावताना रंगीबेरंगी दिसायची—सगळ्यांना भारी कौतुक!
एकदा मात्र त्या मांजरीच्या एका पायाला जखम झाली. ज्याच्या वाट्याला तो पाय होता, त्याने औषध लावून पट्टी बांधली.
आता मांजर तीन पायांवरच फिरू लागली.
संध्याकाळी धावपळीत त्या मांजरीचा धक्का गोडाऊनमधील पेटत्या दिव्याला लागला—
आणि क्षणार्धात संपूर्ण गोडाऊनला आग लागली.
फायदा असेपर्यंत मैत्री
चारही मित्र होते— पण नुकसान झाल्यावर मैत्रीला तडे गेले. उरलेल्या तिघांनी चौथ्यावर आरोप केला— “तुझ्या वाट्याच्या पायामुळेच आग लागली.” वकील, कोर्ट, युक्तिवाद सुरू झाले.
वकिलाने साधे प्रश्न विचारले—
मांजरीचे पाय वाटून घेतले होते का? — होय
तुमच्या वाट्याच्या पायाला जखम झाली होती का? — होय
लोकांना खात्री वाटू लागली—आता हा दोषी ठरणारच!
न्यायाधीशांचा सूक्ष्म विवेक
न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं—
“जखमी पायामुळे आग लागली, हे खरं.
पण आग लागल्यानंतर मांजर धावली ती कोणत्या पायांनी? उरलेल्या तीन पायांनी. जर ती धावलीच नसती, तर आग पसरलीच नसती. म्हणून नुकसानभरपाई तिघांनीच त्या चौथ्याला द्यावी.”
कोर्ट स्तब्ध झालं.
उपनिषद् सांगते तेच सत्य
ही गोष्ट फक्त मांजराची नाही—ती आपल्याच अंतरंगाची आहे. मन, बुद्धी, इंद्रिये आणि जिवात्मा—हे चौघेही एकत्र काम करतात.
पण दोष झाला की प्रत्येक जण दुसऱ्यावर ढकलतो.
कोणी मनाला दोष देतो, कोणी बुद्धीला, कोणी इंद्रियांना.
पण सत्य काय आहे?
हे चौघेही जबाबदार आहेत,
पण सर्वाधिक जबाबदारी जिवात्म्याची आहे.
व्यवहारी माणूस म्हणतो—
“मी सुद्धा जबाबदार आहे.”
अध्यात्मिक माणूस म्हणतो—
“मीच जबाबदार आहे.”
यातच व्यवहार आणि अध्यात्म यांच्यातला फरक आहे.
मन, बुद्धी आणि इंद्रिये कितीही उन्नत किंवा विकृत असली,
तरी “मी प्राण आहे” ही जाणीव जागी असेल,
तर माणूस स्वतःची जबाबदारी स्वीकारतो—
आणि तेथूनच आत्मोन्नतीची सुरुवात होते.
Comments
Post a Comment