जीवनाचा दृष्टिकोन बदलला तर!


कधी विचार केला आहे का— आपल्याला दुःख खरंच परिस्थिती देते की आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन? अपमान, नुकसान, हानी, बदनामी—हे सगळं सारखंच असतं; पण त्यातून कोणी कोसळतं, तर कोणी मुक्त होतं. फरक असतो तो केवळ दृष्टीकोनाचा. जीवन जसं घडतं, तसं स्वीकारण्याची जी अंतःस्थ तयारी असते, तीच माणसाला साधारणतेतून असाधारणतेकडे घेऊन जाते.

ज्ञानी लोकांना—ऋषींना, याज्ञावल्क्य, वसिष्ठ, विश्वामित्रांसारख्यांना—एक मूलभूत जाण असते: माझ्यात आणि ब्रह्मात फरक काय? ब्रह्म सत् आहे, मीही सत् आहे. ब्रह्म आनंदमय आहे, मीही आनंदमय आहे. म्हणूनच अशा अवस्थेत माणूस निर्भय होतो. जणू तो म्हणतो—“भगवंता! तुझ्यात ताकद असेल तर मला दुःखी करून दाखव.”

तुकाराम बुवांच्या जीवनातील एक प्रसंग याच दृष्टीकोनाचं सुंदर उदाहरण आहे. एकदा लोकांनी त्यांना गाढवावर बसवून गावभर फिरवलं. लोकांनी विटंबना केली, अपमान केला. पण तुकाराम बुवा म्हणाले—

 “देवा, आज तुला गरुड सोडून गाढवावर बसण्याची इच्छा झाली होय! कमाल आहे तुझी! काही हरकत नाही. माझी गावात बदनामी झाली, ते चांगलंच झालं. लोक मला मागे मागे सोडत नव्हते; आज मात्र कोणीही विचारत नाही. आज एकांत लाभला. ‘तू’ आणि ‘मी’—आपण निवांत भेटू शकतो.”

अहो, अशा माणसाला दुःखी करणं फार कठीण असतं. असा मनुष्य जणू देवालाच आव्हान देतो—“परमेश्वरा! तुझे सगळे आयपीएस-डीएसपी, म्हणजेच शनि, मंगळ, राहू-केतू सगळ्यांना बोलाव; आणि मला दुःखी करून दाखव.”

अशा माणसाला देव शिक्षा देत नाही—तो त्याला मिठीत घेतो. कारण त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोनच पालटलेला असतो.

संस्कृत नाटक मृच्छकटिक मध्ये चारुदत्ताचं वर्णन याच भावनेला अधिक ठळक करतं. मैत्रेय आणि चारुदत्त घरी परत येतात, तेव्हा घराची सारी संपत्ती चोरीला गेलेली असते. घराच्या भिंतीला मोठं भगदाड पाडून चोर सगळं लुटून गेलेले असतात. चारुदत्त ते भगदाड पाहतो आणि मैत्रेयाला म्हणतो— “अरे, चोरांनी भगदाड पाडलं खरं; पण ते किती कलात्मक आहे!”

हे वाचताना आपल्याला क्षणभर धक्का बसतो. घरातून काय गेलं, यापेक्षा भगदाडाची कलात्मकता त्याला अधिक महत्त्वाची वाटते! पण अशा मनोवृत्तीच्या माणसाला कोणीही दुःखी करू शकत नाही.

हीच खरी Life Philosophy आहे. जीवनाचा असा भव्य, व्यापक दृष्टिकोन उपनिषदांच्या सततच्या स्वाध्यायातून विकसित होतो. विचारांची सतत घडण—जणू हातोड्याने ठोकल्यासारखी—अंतर्मनात इतकी ठसवली पाहिजे की नंतर देवसुद्धा आपल्याला दुःखी करू शकणार नाही.

जीवनात परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं; पण परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आणि एकदा तो दृष्टिकोन बदलला, की दुःख स्वतःच अर्थहीन ठरतं.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन