हंसः — ‘माझा कोण?’ याचा निर्णय



आत्म्याच्या वर्णनात पहिलंच विशेषण दिलं आहे — हंसः. आणि जो भगवंतापर्यंत पोहोचतो, त्यालाच म्हणतात — परमहंस.

हंस म्हणजे काय? तो केवळ पांढरा पक्षी नाही.
बगळाही पांढराच असतो, पण दोघांत फरक आहे.

निर-क्षीर परीक्षा हंसाला करता येते — दूध वेगळं, पाणी वेगळं. बगळ्याला ते जमत नाही.

हीच परीक्षा इतर सगळ्या सजीवांपेक्षा फक्त माणूस करू शकतो.

खरं कोण? खोटं कोण? माझा कोण?
या प्रश्नांवर विचार करण्याची क्षमता
मानवाला आहे.

आपण नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आप्त मानतो. आणि ते काही अंशी खरंही आहे. पण एक सत्य कटू आहे—

जोपर्यंत आपली चलती आहे, तोपर्यंत आपलेपणा आहे.
तुकाराम महाराज म्हणतात —
“जव चाले मोठा धंदा
तव बहिण म्हणे दादा दादा.”

धंदा तेजीत असतो, स्थिती चांगली असते, तेव्हा सारेच जवळचे वाटतात. पण संकट आलं, आणि तरीही जो सोडून जात नाही— तोच खरा आपला.

माणूस दुसऱ्याच्या दुःखात खर्‍या अर्थाने समरस होऊ शकत नाही. आपण सांत्वन करतो, ते व्यवहार म्हणून करतो. मनापासून प्रयत्न करतो, पण आतून तितकं दुखू शकत नाही.

पाच-पन्नास लोकांच्या ओळखी असतील, तर पाच-पन्नास ठिकाणी जावंच लागेल. पण त्या सगळ्यांच्या दुःखात एकाच वेळी समरस होणं
माणसाच्या कुवतीपलीकडचं आहे.

पती-पत्नीचंच उदाहरण घ्या. नवऱ्याचं पोट दुखतंय,
सगळं घर झोपलेलं आहे. बायको विचारते, गरम पाण्याची पिशवी देते, पण थोड्याच वेळात तिलाही झोप येते.

सगळी दुनिया झोपते. बायकोही झोपते. पण जो राम आहे, तो मात्र जागा असतो.

कुष्ठरोग झाला तरी तो सोडून जात नाही. इतर कोणी हात लावणार नाही, पण राम दूर जात नाही.

म्हणूनच शंकराचार्य म्हणतात — ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या.

याचा अर्थ
जग टाकून द्या असा नाही. जगाला त्याच्या जागेवर ठेवा, जगदीशाला त्याच्या जागेवर, आणि स्वतःला आपल्या जागेवर.

आजचं फूल काल नव्हतं, उद्या नसेल. पण म्हणून ते व्यर्थ नाही. क्षणभंगुर म्हणजे टाकाऊ नव्हे.

‘माझा कोण?’ या प्रश्नाचा निर्णय ज्याच्या अंतःकरणात पक्का झाला— “जगदीशच माझा आहे”— तोच खरा हंसः. आणि अशी स्पष्टता
ज्याच्या जीवनात उतरली, तो मानव नसून
परमहंस होतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन