हंसः — जबाबदारीची अंतिम सत्ता
हंसः म्हणजे मी सगळ्यांचा प्राण आहे.
मन, बुद्धी, अहंकार आणि मी — जिवात्मा, हे चारही घटक एकत्र येऊन माणसाचं जीवन चालवत असतात. पण या चौघांमध्ये मुख्य स्थान जिवात्म्याचं आहे.
तोच केंद्रबिंदू आहे.
तोच निर्णयकर्ता आहे.
आज आपण काय करतो?
काहीही घडलं की त्याची जबाबदारी लगेच दुसऱ्यावर ढकलतो आणि स्वतः मोकळे होतो.
आपण अगदी सहज म्हणतो,
“शास्त्रीजी, काय करणार? मनच वाईट आहे. सगळं काही ह्या मनामुळेच घडतं.”
ही भूमिका अत्यंत चुकीची आहे.
तत्त्वज्ञानात तिला अजिबात स्थान नाही.
खरं विधान असं असायला हवं —
“जे काही चांगलं किंवा वाईट घडलं आहे, ते माझ्यामुळेच घडलं आहे. मी त्याला जबाबदार आहे.”
ही कबुली देण्याची तयारी जेव्हा माणसात येते, तेव्हाच आत्मबोधाची सुरुवात होते. गीतेत भगवान स्पष्ट सांगतात —
अधिष्ठानं तथा कर्ता कारणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पंञ्चमम् ||
कर्म घडताना अनेक घटक कार्यरत असतात —
अधिष्ठान, कर्ता, साधनं, विविध चेष्टा आणि दैव.
पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कर्ता म्हणून जिवात्माच उभा असतो.
मन, बुद्धी, अहंकार आणि जिवात्मा — हे चौघेही मिळून काम करतात.
परंतु दोषाचा प्रश्न आला की, जिवात्मा लगेच बाजूला होतो आणि खापर दुसऱ्यावर फोडतो.
विद्यार्थी नापास झाला की शिक्षक म्हणतो,
“मी आधीच सांगितलं होतं — मुलगा अभ्यास करत नव्हता.”
विद्यार्थी म्हणतो,
“आम्ही गुरुजींना प्रश्न विचारले, पण त्यांनी नीट उत्तर दिली नाहीत. परीक्षेत नेमके तेच प्रश्न आले — आम्ही काय करणार?”
अशा प्रकारे दोष दुसऱ्यावर ढकलण्यात माणूस फार हुशार आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की,
त्या घटनेला जबाबदार मी आहे.
माझ्या निर्णयांमुळे, माझ्या दुर्लक्षामुळे, माझ्या आळशीपणामुळे ते घडलं आहे.
ही जबाबदारी स्वीकारण्याची ताकद माणसात आली पाहिजे.
हंसः या शब्दात हाच अर्थ दडलेला आहे —
जे काही घडतं, त्याचा अंतिम कर्ता मी आहे.
मन आणि बुद्धी यांचा प्राण मी आहे.
म्हणजेच साऱ्या यंत्रणांचा कंट्रोलिंग अंकुश माझ्या हातात आहे.
मी माझ्या इच्छाशक्तीने (Will Power)
मन बदलू शकतो,
बुद्धी बदलू शकतो.
मन आणि बुद्धी ही फक्त हत्यारं आहेत.
आणि त्या हत्यारांचा धनी मी आहे.
हंसः म्हणजे
मी बळी नाही,
मी परिस्थितीचा गुलाम नाही,
मी कारण देणारा नाही — मी कर्ता आहे.
Comments
Post a Comment