महान व्यक्तीमत्त्वासाठी भगवंताने ही अश्रू ढाळले.

ज्या ज्या लोकांनी भगवंताच्या हातात शक्ती देऊन हवन केल आहे ते हवन मोठ आहे. आपल्याला जीवनात झिजाव तर लागतच. माणूस बायका मुलांसाठी झिजूनच म्हातारा होतो ना! शक्ती वापरतात तर सर्वजण. पण जे स्वतःची शक्ती, संपत्ती भगवंताच्या हातात ठेवतात तेव्हा त्याला हवन केलं असं म्हणतात.

'संपत्ती स्वतःकमावलेली असेल तर ती कन्या होते, बापाने कमावलेली असेल तर भगिनी आणि दुसऱ्याकडून मिळालेली असली तर परस्री होते. तर ती भोगायची कशी? तेव्हा कोणत्याही प्रकारे बुद्धिमान माणसासाठी लक्ष्मी त्याज्य आहे.' हा काव्य विनोद आहे, शास्त्रीय सिद्धांत नाही, पण लोक हे विनोदातच घेतील याची खात्री आहे.

स्वतःची सर्व शक्ती भगवंताच्या हाती देणे याला हवन म्हणतात. महाभारत युद्धात जेव्हा अभिमन्यू धारातीर्थी पडला तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. भाचा मेला म्हणून श्रीकृष्ण रडला असेल काय? नाही. अभिमन्यूने स्वतःच्या देहाचं विशिष्ट ध्येयासाठी हवन केलं म्हणून भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. अभिमन्यूच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती. समोरच्या पक्षाने चक्रविव्ह रचला आहे. तो भेदू शकेल असे पिताश्री अर्जुन, कृष्णासह दूर गेले आहेत. ते दोघे इतक्यात येऊन चक्रव्यूह भेदू शकतील हे होणे नाही. आणि संध्याकाळपर्यंत आपण चक्रव्यूह भेदू शकलो नाही तर पांडवांचा पराभव अटळ आहे. पांडवांचा पराभव झाला तर त्यांना पुन्हा जंगलात जावं लागेल. यातही काही विशेष नाही पण पांडवांचा पराभव म्हणजे विशिष्ट जीवनधारेचा पराभव मानला जाईल.

महाभारताचे युद्ध हे दोन विचारधारामध्ये होतं. पांडव म्हणत होते की, जीवन ईश्वराधीष्टीत असलं पाहिजे आणि दुर्योधनाचे म्हणणं होतं की, लोक सुखी राहावेत सर्वांना अन्न, वस्त्र, आणि निवारा मिळाला की बस झालं. त्याची कल्याणकारी राज्याची कल्पना होती आणि त्याला ईश्वराची काहीच गरज वाटत नव्हती. दुर्योधनाच राज्य अतिशय उत्तमच होतं. त्याच वर्णन वाचल्यावर तिथे राहण्याचे कुणालाही इच्छा व्हावी अशी सुंदर राज्याव्यवस्था उभं केलं होतं‌. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच होतं की, जीवन सुखी बनवण्यासाठी भगवंताची गरज नाही. पांडव ईश्वराभिमुख संस्कृती आणि जीवनधारेच्या पक्षातले होते आणि दुर्योधन - कौरव ईश्वरविन्मुख संस्कृती आणि जीवनधारा मानणारे होते.

पांडव मानत होते की ईश्वराभिमुख झाल्याशिवाय समग्र मानवी जीवनाचे उन्नती करण शक्य नाही. ही सिद्धांताची लढाई होती त्यामुळे त्यात पांडवांचा पराभव झाला असता तर हा सिद्धांताचा पराभव मानला गेला असता आणि पुढे हजारो वर्षापर्यंत त्याचा मानव जातीवर दुष्परिणाम झाला असता. काहीजण असं मानत होते की, समाज जीवन उभ करण्यासाठी, मानवी जीवन स्थिर करण्यासाठी भगवंताची काही गरज नाही. म्हणून महाभारत युद्ध हे धर्मयुद्ध होतं. त्यात या मूलभूत प्रश्नांचा विवाद होता.

जेव्हा चक्रव्युह रचला गेला तेव्हा पांडव पराभूत होऊ नयेत म्हणुन असा ताजा रक्ताचा युवक अभिमन्यू धर्मराजाला विचारायला गेला की, 'काका! हा चक्रव्यूह दुसरा कोणी भेदू शकेल असं दिसत नाही. माझे पिता भेदू शकतात पण ते आता फार दूर आहेत. मला चक्रव्यूह भेदता येतो पण त्यातून बाहेर निघता येत नाही. पण संध्याकाळपर्यंत मी हे युद्ध चालून नेईन. चक्रव्यूह भेदून आत शिरल्यावर मी मरणार यात मला शंका नाही. पण मृत्यूपर्यंत मी आपला पराभव होऊ देणार नाही. तुम्ही मला अज्ञा द्या.'

धर्मराज त्याला कोणत्या तोंडाने आज्ञा देणार? अभिमन्यूच लग्न होऊन एक वर्षही झालं नव्हतं. आणि स्वतःहून तो मृत्यूमुखात जायला निघाला होता. धर्मराजाला असं झालं की, 'त्याला हो म्हणून मी नाही म्हणू? आणि नाही म्हटलं तर कृष्णाला काय उत्तर देऊ.' शेवटी धर्मराजाने त्याला सुभद्रेकडं अनुमतीसाठी पाठवलं. सुभद्रेने त्याला उत्तरेकडे पाठवलं. सर्वजण जाणत होते की, चक्रव्यूहात गेल्यावर तो बाहेर निघू शकणार नाही. आणि त्यांचं मरण आटळ आहे. यावर अर्जुनाला काय उत्तर द्यायचं? याचीही सर्वांना काळजी होती. नवयौवना उत्तरा क्षणभर विचारात पडली आणि म्हणाली, 'आपण अजून लहान आहोत.' असं असूनही तिला, वीरपतीला भित्र्यासारखं अडवून ठेवणं ही योग्य वाटत नव्हतं. युद्धात चक्रव्यूह भेदण्याची अनुमती देण्याची हिंमत तिलाही होत नव्हती. पण अभिमन्यूनेने तिचं शास्त्र तेज जागं केलं. तो म्हणतो, 'मी क्षत्रिय पुत्र आहे, तसाच सिंहाचा छावा आहे. सिंहाचा छावा जन्मल्यापासून मोठाच असतो. तो मृत्यूला घाबरत नाही.' उत्तरा म्हणते, 'तुम्ही सिंहाचे पुत्र आहात तर मी पण क्षत्रिय कन्या आहे.' असं म्हणत तिने अभिमन्यूला ओवाळलं आणि निरोप दिला. त्यानंतर या बहाद्दर विराने मृत्यूला अक्षरशः कवटाळलं. हे मोठ्यात मोठ हवन पाहून, त्या महान व्यक्तीमत्त्वासाठी भगवंताने ही अश्रू ढाळले. अशा महान अभिमन्यूच स्मरण केलं नाही तर महाभारताला अर्थच राहणार नाही. अभिमन्यू जीवनाच्या विशिष्ट सिद्धांतासाठी मृत्युमुखी पडला. त्याला मृत्यू समोर दिसत होता तरीही त्याने चक्रव्यूहात उडी घेतली होती. यालाच हवन म्हणतात.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.