नृषत् आणि भक्ती : शक्तिहीन भक्तीचा भ्रम
आज भक्तीचा उल्लेख झाला की एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यासमोर येते—
नम्र, लाचार, स्वतःला अक्षम मानणारा भक्त.
“आमच्यात काहीच नाही; सर्व तूच कर.”
“आम्ही अज्ञानी, अशक्त; तूच सर्वशक्तिमान.”
ही भाषा भक्तीची वाटते;
पण उपनिषदांच्या दृष्टीने पाहिलं,
तर ही भक्ती नसून आत्मशक्तीचा अपमान आहे.
उपनिषदांनी मनुष्याला नृषत् म्हटलं—
म्हणजे ज्या ठिकाणी आत्मशक्ती ओळखली जाऊ शकते, विकसित होऊ शकते आणि प्रकट होऊ शकते असा जीव.
मग प्रश्न असा उभा राहतो—
जर मनुष्य नृषत् आहे,
तर भक्ती शक्तिहीन कशी काय असू शकते?
शक्तिहीन भक्ती : एक गैरसमज
आज अनेक भक्त असं म्हणताना दिसतात—
“आमच्यात काहीच शक्ती नाही.”
“सगळं देवावर सोडून द्यायचं.”
हे ऐकायला नम्र वाटतं;
पण प्रत्यक्षात ही जबाबदारीपासून पळ काढणारी वृत्ती आहे.
माझ्यात आत्मशक्ती आहे—
आणि ती मी वापरणार नाही,
माझ्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेणार नाही—
आणि तरीही स्वतःला भक्त म्हणवून घेणार?
उपनिषद हे मान्य करत नाहीत.
नृषत् : भक्तीची पूर्वअट
नृषत् म्हणजे— आत्मशक्ती असलेला नव्हे,
आत्मशक्ती ओळखणारा मनुष्य.
आत्मशक्ती वापरण्याची तयारीच नसेल,
तर ती आहे असं म्हणणं निरर्थक ठरतं.
जसं— माझ्या खिशात पैसे असतील,
पण मला पैसा आणि दगड यात फरकच कळत नसेल,
तर माझ्या खिशात पैसा आहे—याला काहीच अर्थ नाही.
तसंच— आत्मशक्ती आहे,
पण “मी काही करू शकत नाही”
असं म्हणणारा भक्त
खरं तर स्वतःच्या नृषत्त्वालाच नाकारतो.
भक्ती म्हणजे शक्तीचा त्याग नव्हे
खरी भक्ती कधीही शक्तिहीन नसते.
गीतेत अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात—
“क्लैब्यं मा स्म गमः पार्थ”
क्लैब्य म्हणजे भित्रेपणा, अशक्तपणा.
हे शब्द भक्ताला सांगितले आहेत—
शक्तिहीन होऊ नकोस.
भक्ती म्हणजे— “मी काहीच नाही” असं म्हणणं नव्हे,
तर
“माझ्यात जे आहे, ते तुझ्यामुळे आहे—आणि म्हणून मी ते पूर्ण वापरेन”
असं म्हणणं.
भक्ती आणि आत्मशक्ती : खरा संबंध
खरा भक्त असं म्हणतो—
“भगवंता,
मी तुझा होईनच—
एवढंच नाही,
एक दिवस तूच होईन."
हा अहंकार नाही;
ही आत्मशक्तीची सर्वोच्च कबुली आहे.
उपनिषद सांगतात—
आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीत.
मग भक्तीचा अंतिम टप्पा
शरणागती नसून
एकात्मता आहे.
शक्तिहीन भक्ती का वाढली?
शक्तिहीन भक्ती वाढली कारण—
कर्म टाळायचं होतं
जबाबदारी नको होती
अपयशाचं ओझं देवावर टाकायचं होतं
“देवाने केलं”
म्हणणं सोपं आहे.
“मी केलं”
म्हणण्यासाठी आत्मशक्ती लागते.
पण उपनिषदांचा भक्त
पळ काढत नाही.
तो उभा राहतो.
नृषत् भक्त कसा असतो?
नृषत् भक्त—
स्वतःला अक्षम मानत नाही
संकटात देवाला दोष देत नाही
कर्म टाळत नाही
आणि परिणामाची भीतीही बाळगत नाही
तो म्हणतो— “मी पूर्ण प्रयत्न करेन.
फल तुझ्या हाती.”
इथे भक्ती आहे,
पण शक्तिहीनता नाही.
निष्कर्ष
नृषत् आणि भक्ती यांचा संघर्ष नाही;
संघर्ष आहे तो
नृषत् आणि शक्तिहीन भक्ती यांच्यात.
आत्मशक्ती नाकारून केलेली भक्ती
उपनिषदांना मान्य नाही.
खरी भक्ती— आत्मशक्ती जागी करते,
आत्मविश्वास वाढवते,
आणि माणसाला उभं करते.
नृषत् म्हणजे— देवाच्या दारात बसून मागणारा नव्हे,
देवाच्या गुणांना स्वतःमध्ये प्रकट करणारा मनुष्य.
Comments
Post a Comment