आत्मा : अतिथी-वृत्ति
आत्मा अतिथी आहे.
तिथी न ठरलेली.
येणं ठरलेलं नाही,
जाणंही ठरलेलं नाही.
शास्त्र म्हणत नाही — दिवस ठरलेला आहे.
शास्त्र सांगतं — व्यवहार ठरलेला आहे.
श्वास मोजलेले आहेत,
पण दिवस नाहीत.
जो श्वास उधळतो
तो आयुष्य गमावतो.
जो श्वास साठवतो
तो काळ वाढवतो.
काम, क्रोध, लोभ —
हे श्वासाचे भक्षक आहेत.
शांतता, संयम, विवेक —
हे श्वासाचे रक्षक आहेत.
कामी मनुष्य धावतो,
त्याचा श्वासही धावतो.
क्रोधी उसळतो,
श्वास उसळतो.
ज्याची वृत्ती शमते
त्याचा श्वास स्थिर होतो.
ज्याचा श्वास स्थिर
त्याच्या आत अतिथी थांबतो.
प्राणायाम म्हणजे
श्वास वाढवणं नाही,
श्वास खर्च होऊ न देणं आहे.
आत्मा येतो —
जेव्हा श्वास शुद्ध होतो.
आत्मा जातो —
जेव्हा श्वास विस्कळीत होतो.
म्हणून
आत्मा कालाधीन नाही,
वृत्तिधीन आहे.
असा हा अतिथी —
न बोलावलेला,
न थांबवता येणारा,
पण आदराने ठेवता येणारा.
Comments
Post a Comment