श्रमाचं मूल्य होऊ शकत नाही

उपनिषदांचा मूलभूत प्रश्न असा आहे—कृती करणारा कोण?
शरीर चालतं, हात काम करतो, बुद्धी निर्णय घेते; पण उपनिषद सांगतात की या सर्वांच्या मागे जो चेतनकर्ता आहे, तो होता आहे. हा होता म्हणजे देह नाही, मन नाही, बुद्धी नाही; तो आत्मशक्ती आहे.
यज्ञ चालतो कारण होता आहे.
आणि म्हणूनच सर्व श्रम हे मुळात होता-आधारित आहेत.

होता कधी म्हणत नाही—हे श्रम माझे आहेत.
तो फक्त अर्पण करतो.
त्यामुळे श्रम हे स्वामित्वाची वस्तू ठरत नाहीत; ते यज्ञातील आहुती ठरतात.

जे मोजता येतं, त्यालाच मूल्य असतं.
परंतु होता अमेय आहे.
अमेयाच्या श्रमाचं मूल्य कसं मोजणार?

एखादा माणूस आजारी असताना दुसरा माणूस रात्रभर जागून त्याची सेवा करतो—तेव्हा त्या जागरणाचं मूल्य काय?
पाचशे रुपये? पाच हजार?
नाही.
ती सेवा श्रम नाही; ती यज्ञकृती आहे.
त्याला दिलं जाणारं काही असेल तर ते मोबदला नसतो—ते कृतज्ञतेचं अर्पण असतं.
म्हणूनच आपल्या परंपरेत त्याला दक्षिणा म्हटलं गेलं.

दक्षिणा म्हणजे श्रमाची किंमत नव्हे;
दक्षिणा म्हणजे—तू माझ्या जीवनयज्ञात सहभागी झाला आहेस, म्हणून मी तुला ऋण मानतो.

गुरु, वैद्य, ब्राह्मण, कुंभार—हे सारे यज्ञकर्ते होते.
समाज त्यांना मजूर मानत नव्हता;
तो त्यांना यज्ञातील ऋत्विज मानत होता.

कुंभार मडकी घडवत नव्हता;
तो पृथ्वी-जल-अग्नी-वायू यांचा समन्वय करत होता.
त्या क्रियेचं मूल्य करता येणार नाही, कारण ती केवळ उत्पादन नव्हती—ती ऋताशी सुसंगत कृती होती.

आई जेव्हा अन्न शिजवते, तेव्हा ती श्रम करत नाही;
ती अन्नाला प्राण देत असते.
त्याचं मूल्य करता येत नाही, कारण प्राणाचं मूल्य करता येत नाही.

आजचा माणूस म्हणतो—श्रम माझे आहेत.
उपनिषद म्हणतात—
नेति, नेति.
श्रम देहाचे नाहीत, मनाचे नाहीत, अहंकाराचे नाहीत.
ते होता-शक्तीचे आहेत.

म्हणूनच श्रमाला किंमत लावणं म्हणजे—
निर्गुण निराकाराला बाजारात उभं करणं होय.
ही क्रिया अवैदिक आहे, अशास्त्रीय आहे.

समाजव्यवस्था अशी असली पाहिजे की ज्यात श्रम करणारा ‘दुसरा’ वाटू नये.
तो आपल्यातलाच एक असावा.
स्वामी-मजूर नव्हे,
दाता-ग्राही नव्हे,
तर यज्ञातील सहभागी.

आज हा विचार आचरणात येणं कठीण आहे.
अहंकार बलवान आहे, बाजार सशक्त आहे.
पण उपनिषद सांगतात—
ऋत कधीच नष्ट होत नाही;
तो झाकला जातो.

दोन पिढ्यांनंतर, तीन पिढ्यांनंतर—
माणूस पुन्हा हे ओळखेल की
श्रमाचं मूल्य होऊ शकत नाही,
कारण श्रम करणारा मुळात माणूसच नाही—
तो होता आहे.



Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन