जीवन गणितात बसलं; चेतना बाजूला पडली.





राजा गेला, पण स्वामित्व गेलं नाही.
देवाचा अंश म्हणवणारा राजा उतरला; चलनाचा देव उभा राहिला.
कायदा त्याचा मंत्र झाला आणि माणूस पुन्हा वेदीवर उभा राहिला—यावेळी यज्ञासाठी नव्हे, तर उपजीविकेसाठी.

भांडवलवाद आला. डोळे दिपले.
त्या दिपण्यातून भौतिकवाद जन्माला आला.
मार्क्स आणि लेनिन हे व्यक्ती नव्हे; ते त्या दृष्टीचे प्रवक्ते होते.
राजेशाही कोसळली, सरंजामशाही विरली;
पण माणूस मुक्त झाला नाही—तो व्यवस्थेचा अन्न बनला.

प्रश्न राहिला—माणसाचं काय?
या विचारधारांकडे उत्तर नाही.
माणूस समाजाची मिळकत ठरला.
विनाश्रम अन्न पाप ठरलं.
श्रम किती, अन्न किती—याचं मोजमाप सुरू झालं.
जीवन गणितात बसलं; चेतना बाजूला पडली.

जे वेगाने उगवतं, ते वेगाने नष्ट होतं—
हा ऋताचा नियम आहे.
मेथी लवकर उगवते; वड हळू वाढतो.
भांडवलवाद वडासारखा रुजला;
साम्यवाद मेथीसारखा उगवला.
त्याचं आयुष्यही तितकंच क्षणभंगुर असणं स्वाभाविक आहे.

माणूस शिकारी होता, शेतकरी झाला, कारखानदार बनला—
आणि अचानक ‘कॉम्रेड’ झाला.
ही साधना नव्हे; ही उडी आहे.
उडीमध्ये स्थैर्य नसतं, केवळ वेग असतो.

आज मालकी संस्थांची अनेक रूपं उभी आहेत.
एक मोडली तरी दुसरी उभी राहते.
कारण विश्वास तिथेच आहे.
कम्युनिस्टाचाही, कॅपिटॅलिस्टाचाही.
स्वामित्वावरचा हा अंधश्रद्धेचा धागा अखंड आहे.

जोपर्यंत माणूस
“मी कर्ता आहे” या अहंकारातून
“मी अन्नावर जगतो” या भीतीत अडकलेला आहे,
तोपर्यंत त्याचं अन्न परावलंबीच राहणार.

मुक्ती अन्नात नाही,
मुक्ती अन्नाला अर्थ देणाऱ्या चेतनेत आहे.

Comments