जे वेगाने उगवतं, ते वेगाने नष्ट होतं

राजेशाही संपल्यानंतर माणूस मुक्त झाला नाही; त्याची गुलामी केवळ रूप बदलून आली. चलनव्यवस्थेवरील मालकी राष्ट्राकडे गेली आणि कायद्याची गुलामी जन्माला आली. भांडवलवाद वाढला, विकास झाला; पण त्याच वेगाने त्याचे दोषही उघडे पडले. या अस्वस्थतेतून मार्क्स–लेनिनचा ऐतिहासिक भौतिकवाद उभा राहिला आणि त्याला वैचारिक मान्यता मिळाली.

मात्र प्रश्न तोच राहिला—माणसाचं काय? राजेशाही आणि सरंजामशाही नाहीशा झाल्या; पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पोटासाठी नव्या सत्तेची गुलामगिरी स्वीकारावी लागली. माणूस समाजाची ‘मिळकत’ ठरला. विनाश्रम अन्न या विचारधारेला मान्य नाही. श्रम करणाऱ्याला किती जगू द्यायचं, याचंच गणित ती मांडते.

मान्य आहे—या विचारधारांनी भौतिक प्रगतीला गती दिली. पण त्या दीर्घकाळ टिकतील, याची खात्री नाही. जे वेगाने उगवतं, ते वेगाने नष्ट होतं—हा सृष्टीचा नियम आहे. भांडवलवाद संथपणे रुजला; साम्यवाद झपाट्याने उभा राहिला. म्हणून त्याचं पतनही तितकंच जलद होणं अशक्य नाही.

माणूस शिकारी होता, शेतकरी झाला, कारखानदार बनला—आणि अचानक ‘कॉम्रेड’ झाला. ही उडी पायरीपायरीने नाही, तर उचकावणारी आहे. म्हणूनच कॉम्रेडशिप जितक्या वेगाने उभी राहिली, तितक्याच वेगाने कोसळण्याची शक्यता तिच्यात अंतर्भूत आहे.

आज मालकी संस्थांची रूपं अधिक विक्राळ झाली आहेत. एका संस्थेवर हल्ला करून प्रश्न सुटत नाही. कारण या सर्व संस्थांवर सर्वांचाच विश्वास आहे—कम्युनिस्टांचाही आणि कॅपिटॅलिस्टांचाही. मालकीवरचा हा अंधविश्वासच माणसाच्या परावलंबी अन्नाचं मूळ आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.