परावलंबी अन्न
राजाची मालकी संस्था नष्ट झाल्यानंतर एक नवी मालकी संस्था उभी राहिली—ती म्हणजे चलनव्यवस्थेवरील मालकी. ही मालकी राष्ट्राच्या हातात गेली आणि त्यातून कायद्याची गुलामी जन्माला आली. भांडवलवाद जसजसा विस्तारत गेला, तसतसे त्यातील अंतर्निहित दोषही उघड होऊ लागले. विकासाच्या झगमगाटाने लोकांचे डोळे दिपले; पण त्या दिपण्यातूनच मार्क्स आणि लेनिन यांचा ऐतिहासिक भौतिकवाद आकाराला आला. त्यांच्या विचारधारेला केवळ जीवनच मिळाले नाही, तर एक मानाचं स्थानही मिळालं.
मात्र या विचारधारेनं राजेशाही व सरंजामशाही नष्ट केल्या असल्या, तरी माणूस मुक्त झाला का? उलट, स्वतःच्या पोटासाठी प्रत्येक व्यक्तीला नव्या सत्ताधाऱ्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. ‘माणसाचं काय?’ या मूलभूत प्रश्नाचं उत्तर या विचारधारा देऊ शकत नाहीत. पण एक गोष्ट मात्र ठामपणे सिद्ध झाली—आज माणूस हा समाजाची मिळकत आहे.
विनाश्रम माणसाला खाऊ घालणं या विचारधारेला मान्य नाही; इतकंच नव्हे तर ते त्यांना परवडतही नाही. श्रम करणाऱ्याला किती अन्न द्यायचं, याची गणितं मांडण्यातच ही विचारधारा अडकून पडते. मान्य आहे—मानवाच्या भौतिक प्रगतीला यामुळे गती मिळाली; पण अशा विचारधारांना समाजात दीर्घकाळ स्थान मिळेल, याबाबत शंका आहे.
भांडवलवाद विकसित व्हायला आणि स्थिर व्हायला जितका काळ लागला, तितकाच काळ साम्यवादी विचारधारा टिकेल का? याचं उत्तर सृष्टीच्या नियमात दडलेलं आहे. जे जितक्या वेगाने उगवतं, ते तितक्याच वेगाने नष्ट होतं. मेथीची भाजी दोन दिवसांत उगवते आणि तिसऱ्या दिवशी कोमेजते. वडाचं झाड व्हायला पन्नास वर्षे लागतात आणि नष्ट व्हायला तीनशे. माझ्या मते, भांडवलवाद जितक्या संथ गतीने रुजला, तितकी दीर्घायुष्यता साम्यवादी विचारधारेला लाभेलच, याची खात्री नाही.
मालकी संस्थेच्या प्रवासात माणूस प्रथम शिकारी होता, नंतर शेतकरी झाला, त्यानंतर कारखानदार बनला आणि शेवटी अचानक ‘कॉम्रेड’ झाला. माणसाची प्रगती ही पायरीपायरीने घडलेली आहे. जलचरांची शिकार करणारा माणूस नांगर धरू लागला, शेतीत स्थिरावला, कारखानदारीकडे वळला—आणि याच कारखानदारीतून कॉम्रेडशिप इतक्या झपाट्याने उभी राहिली की तिचं पतनही तितक्याच वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज नवनवीन मालकी संस्था विक्राळ रूप धारण करून उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे एखाद्या एकाच मालकी संस्थेवर प्रहार करून प्रश्न सुटणार नाही. इतर सर्व मालकी संस्थांचा समग्र विचार करणे अपरिहार्य आहे. या संस्थांवर सर्वांचाच विश्वास आहे—सर्वांचाच. कम्युनिस्टांचाही आणि कॅपिटॅलिस्टांचाही. असा एकही माणूस सापडणं कठीण आहे की ज्याचा या मालकी संस्थांवर अंधविश्वास नाही.
Comments
Post a Comment