जीवन संघर्षात्मक आहे

जीवन म्हणजे केवळ सुखांचा संच नाही; ते संघर्षांचेही व्यापक मैदान आहे. आपले जुने लोक हे जाणून होते. म्हणूनच त्यांची दैनंदिन जीवनपद्धती केवळ शारीरिक नव्हे, तर आध्यात्मिक शुचिर्भूततेवर आधारलेली होती.

पूर्वी जेवताना लोक त्रिसुपर्ण म्हणत. जेवायला बसल्यावर वायफळ गप्पा नसत. भोजन हा एक यज्ञ मानला जाई. पानात सर्व पदार्थ वाढून दिले जात असताना मंत्रोच्चार सुरू असत. आज ज्याला आपण “माइंडफुल ईटिंग” म्हणतो, तीच संकल्पना आपल्या 

संस्कृतीत फार पूर्वीपासून होती.
अंघोळ करणे म्हणजे फक्त अंगावर पाणी ओतणे नव्हे. न्हाणीघरात स्वच्छ पाणी घेऊन, पाटावर बसून, शांत चित्ताने स्नान करण्याची पद्धत होती. स्नानापूर्वी उच्चारला जाणारा हा श्लोक केवळ परंपरा नव्हे, तर अंतःशुद्धीची प्रक्रिया होती—

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती |
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ||

या श्लोकाचा अर्थ असा की—संपूर्ण पवित्र नद्यांची उपस्थिती या पाण्यात मानून आपण स्वतःला शुद्ध करतो. जसे निश्चिंतपणे स्नान करायचे, तसेच निश्चिंतपणे भोजन करायचे.

त्रिसुपर्णातील आजचा मंत्र आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारतो—

“मी कोणाच्या हाती राहायचं?”

वासनेच्या हाती की प्रभूच्या हाती?

महापुरुष वासना ठेवत नाहीत असे नाही. ते पैसा, सामर्थ्य, साधनं यांची कामनाही करतात. पण कशासाठी? भगवंताच्या कार्यासाठी.
इथेच दोन प्रकार दिसतात—
काही लोक भगवंतासाठी वासना ठेवतात,
तर काही लोक वासनेसाठी भगवंत ठेवतात.

सामान्य माणसाला हा फरक कळत नाही. योग्य प्रार्थना अशी असली पाहिजे—
“देवा, मी वासना ठेवीन; पण ती तुझ्या आदेशाखाली असेल. तुझ्या हाताशिवाय माझी कोणतीही वासना गतिमान होऊ नये.”

मागच्या विचारात आपण हंसः या संकल्पनेचा अर्थ पाहिला. पुढे सांगितले आहे—आत्मा शुचिषत् आहे.
शुचिषत् म्हणजे शुद्ध स्थानी राहणारा. आपले जीवन शुद्ध असले पाहिजे.

सुभाषितकार म्हणतात—

परदारपरद्रव्यपरद्रोहपराङ्मुखः |
गंगा ब्रूते कदागत्य मामयं पावयिष्यति ||

ज्याच्या अंतःकरणात परस्त्रीविषयी कुदृष्टी नाही, परद्रव्याची इच्छा नाही, आणि परद्रव्य पाहूनही असूया उत्पन्न होत नाही—तो इतका पवित्र असतो की गंगामातेलाही वाटते, “असा मनुष्य माझ्या संगतीने पवित्र होईल.”

अशी माणसं निष्काम नसतात. अर्जुनही निष्काम नव्हता. सुभद्रेशी विवाह करण्यासाठी त्याने संन्यास घेतला होता. पण त्याच्या मनात कधीही कुदृष्टी नव्हती. म्हणूनच अर्जुन शुचिषत् ठरतो.

यानंतर सांगितले आहे—आत्मा वसु: आहे.
वसु: म्हणजे आधार. जीवनाचा खरा आधार आत्माच आहे. पत्नी, पुत्र, शेजारी, गरीब, श्रीमंत—सगळ्यांचे जीवन आत्म्यावरच आधारलेले आहे.

मग जीवन म्हणजे काय?

जीवन म्हणजे अनेक गोष्टींची गोळा बेरीज. त्यात केवळ सुख-दुःख नाही, तर असंख्य संघर्ष आहेत.
“जीवन संघर्षात्मक आहे” हा आधुनिक विचार नसून वैदिक विचारधारा आहे.

भाकरीसाठी संघर्ष आहे—तो मान्य करूनच उभे राहावे लागते.
नीतीसाठी संघर्ष आहे—दैव आणि आसुरी शक्तींमधील युद्ध हे त्याचेच प्रतीक आहे.
श्रद्धांमध्ये संघर्ष आहे—संप्रदाय म्हणजे श्रद्धांचा संघर्षच आहे.
शरीरात वासनांचा संघर्ष आहे.

जीवन म्हणजे— साफल्य आणि वैफल्य,
भीती आणि पौरुष,
सौंदर्य आणि कुरूपता,
करुणा आणि द्वेष,
कर्ममयता आणि ग्लानी,
वेग, आवेग, उपरोध, उदारता,
कार्पण्य, रुदन, कामुकता आणि मूढता.

या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात असतातच.

आणि ज्याच्या सोबत भगवंत आहे, त्याच्या जीवनात तर त्या असायलाच हव्यात. कारण ह्याच गोष्टी मानवाला घडवतात.

हे सर्व मिळूनच मानवी जीवन आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन