कर्तेपणाचा भ्रम
माणूस आयुष्यभर एक वाक्य ठामपणे म्हणत असतो— “मी केलं.”
मी चाललो, मी बोललो, मी विचार केला, मी नाम घेतलं, मी साधना केली.
पण खरंच मी केलं का?
आपण चालतो, पण चालण्याची प्रक्रिया आपल्याला ठाऊक नसते. पाय उचलणं, संतुलन राखणं, स्नायूंची हालचाल, नसा देत असलेले संकेत—या सगळ्याची माहिती आपल्याला नसते. तरीसुद्धा चालणं घडतं. कारण चालवणारी शक्ती आपण नाही, तर अंतरातली आत्मशक्ती आहे.
आपण बोलतो, पण शब्द कुठून येतात? विचार आधी येतो की शब्द आधी येतो? विचार येतो तरी कसा? या सगळ्या प्रक्रियांमध्ये माझा हस्तक्षेप किती आहे—हा प्रश्न माणूस स्वतःला विचारत नाही. म्हणूनच कर्तेपणाचा भ्रम निर्माण होतो.
खाल्लेलं अन्न आपण खातो, पण पचन आपण करतो का? रक्त तयार करणं, श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड—यापैकी एकही क्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. तरीसुद्धा आपण म्हणतो, “मी जगतो आहे.”
खरं तर, जगणं आपल्यातून घडत आहे.
हा भ्रम फक्त दैनंदिन जीवनापुरता मर्यादित नाही; तो साधनेतही येतो.
“मी नामस्मरण केलं”, “मी जप केला”, “मी ध्यान केलं”—हे सगळे वाक्य कर्तेपणातूनच येतात. पण प्रश्न तोच आहे—नाम आठवलं तरी कोणामुळे? मन एकाग्र झालं तरी कोणामुळे?
जेव्हा माणूस हे पाहायला लागतो, तेव्हा हळूहळू मी विरघळायला लागतं.
आणि ज्या क्षणी मी कमी होतो, त्या क्षणी अंतरातली शक्ती स्पष्ट दिसू लागते.
कर्तेपण सुटणं म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे.
उलट, कर्तेपण सुटलं की जीवन अधिक सहज, अधिक शुद्ध, अधिक प्रवाही होतं.
तेव्हा कृती राहते—पण अहंकार राहत नाही.
तेव्हा साधना राहते—पण गर्व राहत नाही.
हा कर्तेपणाचा भ्रम ओळखणं हीच आत्मशुद्धीची पहिली पायरी आहे.
Comments
Post a Comment