अंतरिक्षसत् : आत्म्याचे सामाजिकीकरण


    
पुढचं विशेषण आहे अंतरिक्षसत्—म्हणजे आत्मा सर्वांमध्ये, अंतरिक्षात वास करतो. हे आत्म्याचं सामाजिकीकरण आहे. याचा अर्थ असा की, मला जगात जास्तीत जास्त लोकांना धारण करता आलं पाहिजे. स्वतःला सोडून उरलेलं जे काही आहे ते समाजात येतं–जातं. पत्नीही समाजात येते, पुत्रही समाजात येतो.

अंतरिक्षसत् आत्मा आहे याचा अर्थच हा की, प्रत्येक शरीराच्या अंतरंगात कार्यरत असलेली जी केंद्रभूत शक्ती आहे, ती म्हणजे आत्मा. माझ्या शरीरात सुरू असलेल्या असंख्य क्रियांची केंद्रीभूतता आत्मशक्तीत आहे—हाच अंतरिक्षसत् शब्दाचा खरा अर्थ.

मी जेव्हा एखाद्या तत्त्वज्ञानीसोबत चर्चा करतो, तेव्हा केंद्रस्थानी आत्माच असतो; आणि जेव्हा मी पाच वर्षांच्या मुलाशी गप्पा मारतो, तेव्हाही तोच केंद्रभूत आत्मा असतो. फरक इतकाच की, त्या मुलाला वेगळ्या भाषेत समजावावं लागतं.

आकाशात ढगांचा गडगडाट झाला की लहान मूल विचारतं,
“बाबा, हा आवाज कसला?”
तेव्हा वडील सांगतात,
“वर इंद्राच्या दरबारात लग्न आहे. सनई–चौघडे वाजतायत. तोच हा आवाज!”

हे सांगताना माणूस जितका तल्लीन असतो, तितकीच तल्लीनता उपनिषद समजावताना सुद्धा असायला हवी. लहान मुलांशी बोलताना माणूस सहजपणे ‘मूढता’ स्वीकारतो; पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र तो ती स्वीकारायला तयार नसतो.

प्रत्यक्षात जीवनात जितकं ज्ञानाचं महत्त्व आहे, तितकंच अज्ञानाचंही आहे. जसं ज्ञानावर प्रवचन देता येईल, तसंच अज्ञानावरही देता येईल. अहो, अज्ञान आहे म्हणूनच तर जीवन आहे! आणि ज्ञान–अज्ञान या दोहोंची केंद्रीभूतता आत्मशक्तीतच आहे. शहाणपणा आणि मूढपणा—या दोहोंच्या मध्यभागी आत्मशक्तीच आहे.

म्हणूनच मुंगी असो किंवा याज्ञवल्क्य—दोघांच्याही केंद्रस्थानी तीच आत्मशक्ती आहे.

याच अर्थाने महापुरुष समाजात सर्वांमध्ये जाऊन बसतात. त्यांना सर्वांमध्ये बसता येतं. नारद महान होते, कारण ते राक्षसांमध्येही बसत आणि देवांमध्येही. दोघांशीही त्यांचं सख्य होतं. 
महाभारतात ते एकीकडे कंसाला उपदेश करताना दिसतात, तर दुसरीकडे कृष्णाला आशीर्वाद देताना. कंसाला दिलेला त्यांचा उद्देश वाचला की प्रश्न पडतो—नारद नेमके कोणत्या पातळीवर वावरत होते?

अनेकदा असं होतं की, माणूस आत्मशक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच वेळी त्याला सगळ्यांमध्ये बसता येत नाही. समाजात वरच्या पातळीवर असलेल्यांना कमी अक्कल असलेल्यांपाशी बसता येत नाही. आपण मोठे असू तर लहानांसोबत बसणं जमत नाही. श्रीमंताला गरीबाजवळ बसणं कठीण जातं.

काही जण मात्र श्रीमंत असून झोपडपट्टीत जातात आणि अभिमानाने सांगतात,
“आम्ही झोपडीतल्या लोकांकडे जातो!”

पण तिथे जाऊन जर तुम्ही सतत हेच दाखवत असाल की मी मोठा आहे आणि ते लहान आहेत, मी दयाळू आहे आणि ते दिन आहेत, तर अशा जाण्याची काहीच गरज नाही. झोपडीतल्या माणसाचं तुमच्याविना काहीही अडत नाही.

महापुरुष मात्र शहरात जातात, लहानांमध्ये बसतात, मोठ्यांमध्येही बसतात—आणि तरीही कोणालाच हलकं मानत नाहीत. कारण ते अग्नीसारखे असतात.

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् |
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ||

अग्नी लांब लाकडावर चेतवला तर दूरवर पेटतो, लहान लाकडावर चेतवला तर थोड्याच वेळात शांत होतो. गोल आधार असेल तर गोल होतो, चौकोनी असेल तर चौकोनी. जसा आधार, तसा आकार—पण अग्नीचा तेजस्वीपणा कमी होत नाही.

तसाच अध्यात्मिक माणूस ज्या व्यक्तीजवळ जातो, तिच्यासारखा बनतो; तिच्या पातळीवर उतरतो. पण त्यामुळे त्याचं महत्त्व कधीच कमी होत नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन