संघर्ष, स्वाध्याय आणि आत्म्याची वसुरूपता : वेदव्यासांचे देणे

संघर्षांचे अनेक प्रकार आहेत.
जीवनात चाललेले संघर्ष, बाहेर दिसणारे संघर्ष, विश्वात सुरू असलेले संघर्ष—
मनुष्य विरुद्ध मनुष्य,
मनुष्य विरुद्ध समाज,
मनुष्य विरुद्ध निसर्ग,
मनुष्य विरुद्ध विश्व.

इतक्यावरच संघर्ष संपत नाहीत. माझ्या अंतरातल्या अनंत वासनांचे संघर्षही सतत सुरू असतात. या सर्व संघर्षांमध्ये मला डगमगता कामा नये; उलट भक्कमपणे उभं राहून पुढेही जायला हवं. यासाठी वेळेची जाणीव, दिवसांची शिस्त आणि आत्मशक्तीची धारणा आवश्यक आहे. म्हणूनच उपनिषद वाचताना वेदव्यासांना अंतःकरणातून अनंत प्रणाम करावेसे वाटतात.
वेदव्यासांनी जीवनात नेमकं काय केलं आहे, याची आपल्याला पुरेशी जाणीवच नाही. त्यांना “व्यास” का म्हणतात? व्यास म्हणजे काय?
सत्यं परं धीमहि—जीवनाचं तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे ते व्यास.

व्यासांनी माणसाला संघर्षात उभं राहण्याची ताकद दिली आहे. म्हणूनच ते सर्वांपेक्षा मोठे आहेत. सरस्वतीच्या घरातील कौस्तुभमणी शेक्सपियर होऊ शकत नाही, कालिदासही होऊ शकत नाही. ते स्थान केवळ वेदव्यासांनाच प्राप्त आहे.

शेक्सपियर महान आहे—तो दाखवतो की महान चरित्र कसं पतीत होतं, परिस्थितीच्या दडपणाखाली सिंह कसा बकरा बनतो.
कालिदास महान आहे—तो दाखवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सिंह सिंहच राहतो; त्याची पात्रे घासून-पुसून लख्ख असतात, दोषरहित असतात.

पण वेदव्यासांनी न भलतं आदर्शवाद रंगवला, न केवळ पतनाचं नाट्य. त्यांनी जीवन जसं आहे तसं उभं केलं. जोपर्यंत वेदव्यास वाचले जात नाहीत, तोपर्यंत माणूस जीवनातल्या संघर्षांमध्ये भक्कमपणे उभा राहू शकत नाही. नैतिक, सांस्कृतिक आणि वैश्विक पातळीवरचे संघर्ष त्याला समजतच नाहीत.

म्हणूनच गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—

ऋषीभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥

जे वेद सांगतात, तेच व्यास सांगतात. ब्रह्मसूत्रे व्यासांनीच रचली. म्हणून वेदांचा स्वाध्याय करायचा असेल, तर व्यासांचा स्वाध्याय केला पाहिजे—असं गीता स्पष्ट सांगते.

व्यास आत्म्याची वसुरूपता समजावतात.
वसु म्हणजे माझा आत्मा—जो परिस्थितीपुढे नतमस्तक होत नाही, तर परिस्थितीला पुरून उरतो. म्हणून वेदव्यासांच्या वाङ्मयाचा स्वाध्याय रोज झाला पाहिजे. एक-दोन दिवस वाचून किंवा ऐकून भागत नाही. आजार मोठा असेल तर सहा-सहा महिने औषध घ्यावं लागतं; तसे वेदही सहा जन्मांनंतरच समजतील.

म्हणून कुणी विचारू नये—“बारा वर्षे वेद वाचतोय, पण परिस्थिती बदलत नाही.” कदाचित सहाव्या जन्मात असा क्षण येईल, जेव्हा आत्म्याची वसुरूपता उमगेल. आणि ती विकसित करण्यासाठी सर्वांत उपयुक्त वाङ्मय कोणतं असेल, तर ते वेदव्यासांचंच आहे.

भारतीय संस्कृतीने आपल्याला काय दिलं?
वेदव्यास दिले.

वेदव्यास वाचा आणि स्वतःला विचारा—खरंच काही कमी पडतंय का?
आज अनेक जण पुस्तकं वाचतात; काही तर पुस्तकं वाचून-वाचून रोगी होतात—जसं औषध अति घेतल्यावर आजार वाढतो तसं. काय वाचायचं याची अक्कल हवी. वाचन जर जीवनाला आधार देत नसेल, तर ते वाचन निरर्थक आहे.

सामान्य माणसाने एवढं तरी लक्षात ठेवावं—प्रतिकूल परिस्थितीतही मला सिंहच राहायचं आहे; बकरा बनायचं नाही.

आणि तरीही कधीकधी परिस्थिती माणसाला बकरा बनवते—कारण ही काही फक्त महापुरुषांची गोष्ट नाही, सामान्य माणसाचीच गोष्ट आहे. अशा वेळी काय करायचं? सत्य स्पष्ट दिसत असतं, विचार योग्य असतो; पण समोरच्याला समजावूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा अस्वस्थता येते. माझे सद्विचार माझ्यापुरतेच राहतात—शरीरातच जीर्ण होतात.

अशा वेळी वेदव्यासांची शिकवण जीवनाला उच्च स्तरावर नेते. जीवनात वैफल्यही येईल, साफल्यही येईल—दोन्ही अवस्थांमध्ये टिकवून ठेवण्याची ताकद व्यास देतात.

भिरुता आणि पौरुष—दोन्ही गुण हवेत. जोडे आणि टोपी दोन्ही लागतात; टोपी आत घेऊन जातात, जोडे बाहेर काढतात. तसंच, मुढता किती आणि विद्वत्ता किती, हे ठरवणारा मी स्वतः आहे. मुढता हवीच; पण ती कुठे, किती वापरायची याचे नियम असतात. योग्य प्रकारे स्वीकारलेली मुढता माणसाला अध्यात्मिक ज्ञानापर्यंत घेऊन जाते—हे सामर्थ्य वेदव्यासांच्या वाङ्मयात आहे.

वसुरुद्रादित्या स्वरूपाः—पितरांनाही आपण वसुरूप मानतो. ज्यांनी श्राद्ध केलं आहे त्यांना माहीत आहे, केवळ शिधा देऊन कर्म संपत नाही; आत्म्याची वसुरूपता टिकवावी लागते. आत्म्याची वसुरूपता प्राप्त झाल्यावर संघर्ष येतातच; पण ज्यांना जीवन लीला वाटतं, तेच “तुष्यन्ति च रमन्ति च” अशा अवस्थेत जगू शकतात.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन