अनासक्ती आणि समृद्धी
आज एखादी वस्तू आपल्या जवळ आहे, पण मनात जर सतत भीती असेल — “ही गेली तर?” — तर साऱ्या आनंदाचा नाश होतो.
वस्तू गेली तरी आपलं चैतन्य जाऊ नये, ही वृत्ती निर्माण केली पाहिजे.
“वस्तू गेली तर जाऊ दे, मला तिची गरज नाही.”
हे म्हणण्याची हिंमत ज्याच्यात असते, तोच खरा जीवनात निर्धास्त राहतो.
पैसा आज आहे, उद्या नसू शकतो — पण जो ‘असला तर ठीक, नसला तरी चालेल’ अशा वृत्तीने जगतो, त्याच्याकडेच लक्ष्मी टिकते.
कारण लक्ष्मीला आसक्ती आवडत नाही; आशाळभूत नजर तिच्या स्वभावाविरुद्ध आहे.
पुराणात याचाच सुंदर दृष्टांत आहे.
देव आणि दैत्य सागरमंथन करत होते. त्यातून लक्ष्मी निघाली — सर्वांची नजर तिच्याकडे.
सर्वजण तिला मिळवण्याच्या आसक्तीने पाहत होते. पण तिने कोणाच्याही गळ्यात वरमाला घातली नाही.
भगवान विष्णू मात्र शांत बसले होते —
“ती यायची असेल तर येऊ दे, जायची असेल तर जाऊ दे; मी सुखी आहेच.”
या अनासक्त शांततेत लक्ष्मीला आपलं खरं स्थान सापडलं. ती धावत आली आणि विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली.
हीच तिची आजवरची सवय झाली आहे —
जिथे आसक्ती नाही, तिथे लक्ष्मी नांदते.
जिथे तृष्णा आहे, तिथून ती निघून जाते.
Comments
Post a Comment