मृत्यू म्हणजे निरोप नव्हे, परतावा



कधी कधी माणसाला मरायला वेळ लागतो — कारण मरणं म्हणजे केवळ देहाचा अंत नाही, तर एका दीर्घ सहवासाचा निरोप असतो. आणि निरोप देणं सोपं नसतं. काही जणांना एखाद्या भेटीतून परतताना, "चालते आता ह!" म्हणत दारात उभं राहून पुन्हा दोन शब्द बोलण्याची, पुन्हा एकदा वळून पाहण्याची सवय असते. ते जगण्याचं प्रेम आहे, माणुसकीची ऊब आहे. त्याचप्रमाणे काही आत्म्यांना देह सोडताना वेळ लागतो — कारण ते अजून काही सांगून जायचं असतं, काही नातं सहजतेने संपवायचं असतं.

पण हे सगळं केवळ बाह्य आहे. खरं मरण म्हणजे प्रवासाचा शेवट नव्हे, तर परतीचा मार्ग सुरू होणं आहे.

माणूस जन्मतो तेव्हा त्याला रडताना पाहून आपण घाबरतो; पण ते रडणं दुःखाचं नसतं, ते तर पहिल्या श्वासाचा उत्सव असतो. तसंच मृत्यूच्या वेळी दिसणारं कण्हणं, आचके, यातना — या सगळ्या देहाच्या हालचाली असतात; आत्मा त्या वेळी शांत असतो. जन्माच्या वेदना आपण अनुभवल्या नाहीत, आणि मृत्यूच्या वेदना अनुभवण्याची गरजही नाही.

ज्याने आपल्याला जन्माच्या क्षणी आपल्या कडेवर घेतलं, तोच हात मृत्यूच्या वेळी आपल्याला पुन्हा आपल्या कडे घेतो. म्हणून मृत्यू हा नवा हात नसतो, तोच परिचित हात असतो — फक्त दिशाच बदललेली असते.

आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा सांगतं की मृत्यूच्या क्षणी संवेदना मंदावतात, वेदना नाहीशा होतात. म्हणजेच भीती ही बाह्य आहे, ती समाजाच्या कल्पनांनी तयार केलेली आहे.
मृत्यू म्हणजे विसर्जन नव्हे, विलीन होणं आहे — जसं नदी समुद्रात मिसळते. त्या क्षणी ती नदी नावाने संपते, पण पाण्याने नव्हे.

जीवन आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये भगवंताचा तोच हात आहे — एकाने पुढे ढकललं आणि दुसऱ्याने परत घेतलं. या जाणिवेत स्थिर झालं की, मृत्यू हा दुःखाचा शेवट नसून, प्रेमाचा परतावा वाटतो.

मग “मरण” या शब्दालाही आपण नव्या नजरेनं पाहू शकतो —
मरण म्हणजे ममत्वातून रण सुटणं आणि शांततेकडे जाणं.

ध्यानमंत्र

“ज्याने मला जन्म दिला, तोच मला मृत्यू देतो;
पण देतो ते अंत नव्हे — अनंतात परतवतो.”

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन