एक तास म्हणजे काय?
आपल्या दिवसाच्या चक्रात असा एक तास असतो का, की जिथे आपण कुणाचेही नसतो? स्वतःचेही नव्हे – म्हणजे आपल्या भूमिका, जबाबदाऱ्या, विचार, चिंता यांच्याही पलीकडचं काही. एक तास – जिथे आपण कोणालाही उत्तर देण्याचं बंधन न ठेवता, कोणत्याही अपेक्षांचं ओझं न पेलता, एकटं असतो – पण ओझ्याखाली नाही.
माणसाच्या डोक्यावर फार काही असतं – घर, काम, जबाबदाऱ्या, चिंता, आठवणी, अपेक्षा, गृहितकं. हे सारं जर एक तासासाठी उतरवून ठेवता आलं, तर त्या माणसाला ब्रह्मलोके महीयते – ब्रह्मलोकात स्थान मिळतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सगळं बाजूला ठेवण्यासाठी एक संधी असते – स्वाध्याय. पण आपण ही संधी किती वेळा घेतो? कधी घेतो?
आपण आपल्या आठवड्यात एक तास देखील निव्वळ स्वतःसाठी ठेवतो का? आणि ठेवतो, तरी तो खरंच 'स्वतःसाठी' असतो का – की फक्त एखादा मोबाईल हातात घेऊन, सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहून जाणारा वेळ?
जिथे माणूस स्वतःच्या मनाचं दार उघडतो, विचारांना स्वच्छ वारा देतो, आठवणींचा आरसा पुसतो, आणि त्या शांततेच्या जागेत स्वतःलाच पाहतो. हा तास म्हणजे विश्रांती नाही, सुट्टी नाही – तो एक प्रवास आहे. अंतर्मुखतेकडचा, चिंतनाकडचा, आणि अखेरीस आत्मदर्शनाकडचा.
जसं शाळेतील मुलं मधल्या सुट्टीत वर्गाच्या ओझ्यातून मुक्त होतात, तसंच काहीसं आपणही करू शकतो. हे ओझं टाकून, उड्या मारत, मनमोकळं बागडत एक तासासाठी मोकळं व्हावं. पुन्हा एकदा आपल्या विचारांचं, भावना आणि इच्छांचं मैदान शोधावं.
कारण दिवसाच्या चोवीस तासांतून एक तास स्वतःसाठी काढणं म्हणजे स्वार्थ नव्हे – ती आत्ममुक्तीची प्राथमिक सवय आहे.
Comments
Post a Comment