द्रुते चित्ते प्रविष्टाया...


जीवनात खरी शितलता कुठून येते? बाह्य साधनांमधून नव्हे; ती येते अंतःकरणातल्या तपातून. ब्रह्मदेव जेव्हा परमेश्वराकडे शाश्वत सत्य शोधायला गेले, तेव्हा त्यांना मिळालेलं पहिलं उत्तर होतं – "तप करा." वेदांत हे सूचित केलं आहे – "स तपो तप्यत।" म्हणजेच, तप हेच सृजनाचं मूळ तत्त्व आहे.

तपाचं स्वरूप दोन अंगांनी समजावं लागतं – एक अंतस्तप आणि दुसरं बहिस्तप. बहिस्तपाने जीवन तेजस्वी होतं, परंतु अंतस्तपाने मन निर्मळ, शांत आणि शितल होतं. अंतःकरणातली ही शितलता म्हणजे भक्तीची फळं आहे.

भक्ती म्हणजे केवळ भजन, पूजन वा परंपरा नव्हे – ती एक संपूर्ण शास्त्र आहे. शास्त्र म्हणून भक्ती केली गेली तर ती मनात खोल परिवर्तन घडवते. चित्त एकाग्र झालं की अंतःकरण द्रवतं. आणि एकदा अंतःकरण द्रवलं की, त्यात भगवंताचं प्रतिबिंब उमटायला सुरुवात होते.

वाल्मिकीचं उदाहरण घ्या. रोज पाच-दहा जणांना मारणारा रत्नाकर एका क्षणी इतका संवेदनशील झाला की, एका क्रौंच पक्षाच्या जोडीला झालेलं दु:ख पाहून त्याचं मन हळवं झालं. व्याधाला विचारलं – "तू या पक्षाला का मारलंस? त्याचं तुझं काय वैर होतं?"

या क्षणी कुणीतरी त्यालाच विचारायला हवं होतं – "रत्नाकर, तूच पंधरा वर्षांपूर्वी समोर येईल त्याला मारत होतास, त्यांचं तुझं काय वैर होतं?" पण त्याची गरजच उरली नव्हती, कारण त्याचं अंतःकरण बदललं होतं – भक्तीमुळे. हा बदल एका रात्रीत नाही झाला, पण ज्या भक्तीत शुद्धता आहे, शास्त्र आहे, तिथं परिवर्तन अटळ असतं.

आज आपण भक्ती करतो, पण त्यात ना ज्ञान आहे, ना अनुभव, ना तेज. म्हणूनच ती भक्ती बहुधा निष्फळ वाटते. खरी भक्ती ही द्रुते चित्ते प्रविष्टाया गोविंदाकारता स्थिरा – अशी असते. चित्त गतिमान झालं पाहिजे – ते भगवंताच्या दिशेने, आणि त्या प्रवासात अंतःकरण स्थिर आणि शितल झालं पाहिजे.

हीच भक्ती – अनुभवांनी समृद्ध, ज्ञानाने दिशा दाखवणारी आणि तेजस्वी करणारी – आपल्या जीवनात बदल घडवू शकते. हे बदल हेच खरे चमत्कार आहेत.


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन