भाग 3 जीवनात आरसा आत्ममीमांसाक



  ५: वासना — प्रभाव आणि त्यावर विजय

मन, बुद्धी आणि देह या तिन्हींच्या पलीकडे असलेला एक सूक्ष्म पण अत्यंत बलाढ्य घटक म्हणजे वासना. वासना म्हणजे केवळ भौतिक भोगांची इच्छा नव्हे, तर असक्त मनाच्या आकांक्षा — प्रतिष्ठा, सत्ता, अधिकार, भावनिक अधिरता, किंवा कोणत्याही प्रकारचं “माझं” असं वाटणं.

वासनेचा प्रभाव — चित्ताची गुंतवणूक

वासना ही केवळ बाह्य आकर्षणांशीच संबंधित नसते, ती आत्मस्मृतीच्या पातळीवर कार्य करते. म्हणजेच, पूर्वसंचित संस्कारांमधून उगम पावते आणि चित्ताला त्या दिशेने खेचते.

या वासनांमुळे —

मन अस्थिर राहतं,

बुद्धी भ्रमित होते,

निर्णय चुकतात,

आणि आत्ममीमांसेचा मार्ग धूसर होतो.

श्रीमद्भगवद्गीतेत (अध्याय २, श्लोक ६२-६३) स्पष्ट सांगितलं आहे:

> "सङ्गात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते..."

संग वासनांचा जन्म करतो, वासना अपूर्ण राहिल्यास क्रोध निर्माण होतो, आणि क्रोधामुळे विवेक नष्ट होतो.

वासनेवर विजय — पराभव नव्हे, रूपांतर

वासनेवर विजय म्हणजे त्यांचा दमन नव्हे, तर त्यांचं रूपांतर —

वासनेचं ध्यानात रूपांतर

आसक्तीचं समर्पणात रूपांतर

कामनेचं सेवेच्या इच्छेत रूपांतर

यासाठी आवश्यक असतो —

स्वधर्माचा स्वीकार

सात्विक जीवनशैली

संपर्काचं शुद्धीकरण (सत्संग, स्वाध्याय)

आणि अंतःकरणातील जागरूकता

वासनेवर विजय हा एकाच वेळी मिळणारा नसतो. तो क्षणोक्षणी घडणारा यज्ञ आहे — जिथे "स्व" रोज अर्पण होत जातं.

विजयाचं मूळ — स्वतःची ओळख बदलणं

जोवर "मी देह आहे" ही भावना आहे, तोवर वासना ठाण मांडून राहतात. पण "मी आत्मा आहे, साधक आहे, भक्त आहे" ही जाणीव स्थिर झाली की, वासना मागे सरतात. आणि म्हणूनच आत्ममीमांसेत वासनेवर विजय म्हणजे — ओळख बदलण्याची प्रक्रिया.

६: इंद्रियं — नियंत्रण, स्वीकार आणि साधनतेचा मार्ग

 देह झिजवण्यामागचा भावार्थ — सेवा की साधना?

"देह झिजवणं" या शब्दात एक प्रकारची त्यागाची आणि समर्पणाची छटा आहे. पण आत्ममीमांसेच्या संदर्भात पाहिलं, तर हा त्याग किंवा झिजवणं केवळ शारीरिक श्रमाचं नव्हे, तर संकल्पनेचं झिजणं आहे — स्वार्थी भावना, अभिमान, अहंकार, वासना आणि शरीराभिमान यांचं झिजणं.

देह झिजतो म्हणजे नेमकं काय होतं?

देह झिजवणं म्हणजे —

सेवा करताना कष्ट सोसणं नव्हे,

साधनेत बसताना त्रास सहन करणं नव्हे,

किंवा शरीराला त्रास द्यायचं नव्हे;

तर देहाचं साधन म्हणून होणारं योग्य आणि समर्थ वापर — ज्यात शरीर कधी श्रम करतं, कधी संयम पाळतं, कधी तप करतो, तर कधी मौन धारण करतो — हे सगळं त्यागासाठी नव्हे, तर आत्मप्रकाशासाठी असतं.

भावार्थ — देह झिजवणं म्हणजे देहाच्या पलिकडे जाणं

जेव्हा शरीर सेवा, साधना, संयम आणि समर्पण यासाठी वापरलं जातं, तेव्हा त्याचं झिजणं हे कर्मयोगाचं प्रतीक ठरतं.

एक साधू अन्न मिळवण्यासाठी डोंगर चढतो

एक माता दिवसरात्र लेकराच्या सेवेत व्यग्र असते

एक शिक्षक शेकडो विद्यार्थ्यांवर ज्ञानसंस्कार करतो.

या सर्वांचा देह झिजतो — पण तो झिजतो स्वतःपुरता नव्हे, तर एका श्रेष्ठ हेतूसाठी.

गीतेतून दृष्टीकोन

“कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, योगिनः कर्म कुर्वंति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये” (गीता ५.११)

योगी आपला देह, मन, बुद्धी आणि इंद्रिये यांचा उपयोग करत असतो, पण त्यातून आत्मशुद्धीचं साधन बनवत असतो — हेच झिजवणं.

देह झिजतो तेव्हा आत्मा झळकतो

जसं दिवा झळकतो, पण त्यामागे तेल झिजतं — तसंच, आत्म्याचं तेज प्रकट होतं, पण त्यासाठी देह झिजतो.
पण ही झीज विठलाच्या चरणी ठेवलेली असेल, तर ती झीज नसून यज्ञ ठरते.

Comments