Union is strength - Union Loyalty
एके काळी कृण्वन्तो विश्वमार्यम् - आर्य विचारांनी अवघं विश्व भरून टाकीन ही आर्यांची महत्त्वकांक्षा होती. ज्ञानेश्वर सुद्धा हेच म्हणाले -
अवघाचि संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक||
ही ऐश्वर्य प्राप्तीची राजविद्या आहे, जी आपला समाज जेव्हा जेव्हा विसरला आहे तेव्हा तेव्हा संस्कृती खलास झाली आहे, अध्यात्म खलास झाले आहे; अहंनिष्ठा वधारली आहे, आत्मनिष्ठा वधारली आहे आणि आत्मख्याती बळावली आहे. आपण बोलतो union is strength - एकतेत शक्ती आहे. ही शक्तीच राजविद्या आहे. आपल्या पूर्वजांनीही राज विद्या उचलली तेव्हा ते भौतिक आणि अध्यात्मिक उत्कर्षाच्या परमोच्य शिखरावर पोहोचले आणि असेच लोक स्वतःची संस्कृती टिकवू शकतात, स्वतःची निष्ठा टिकू शकतात. तेच लोक समाजात संस्कृती उभी करू शकतात. आणि त्यानंतरच समाजात अध्यात्माचा विकास होतो. आम्ही लाख लाख माणसं पंढरपूरला दर्शनाला जातो हो हो इतकी माणसं दर्शनाला जातात की बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवता मिळवता नाकी नऊ येतात. पण एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही, एकाच्या मागणीचा दुसऱ्याशी मेळ नाही. प्रत्येक माणसाची मागणी निराळी असते.
आपल्या देशाची ऊर्ध्वगती तोपर्यंत होती, संस्कृती तोपर्यंत उभी होती की जोपर्यंत आपण ही राज विद्या सांभाळली होती. आणि म्हणूनच शेकडो महर्षी तप करू शकत होते. जिथे तप करण्याची जागाच असत नाही असा पशुतुल्य समाज जेव्हा उद्भवतो तेव्हा एका माणसाला देखील तप करणं शक्य होत नाही. सगळं वायुमंडलच प्रदूषित होऊन जातं.
आपले त्याकाळचे लोक, की ज्यांनी पापाचरण तर कधीही केलं नाही, सगळं पुण्याचरण करत होते. एतकच नाहीतर एकेक हंगामात एक एक पिक जसं भरगोस निघत ना तसं त्या काळात प्रत्येक प्रांता प्रांतात संतांचे जणू काही भरघोस पीक आलं होतं. त्याकाळी खरोखरच संतांची मांदयाळी या भूमीवर अवतरली होती आणि प्रत्येक प्रांतात भगवान नामसंकीर्तनाचा जयघोष चाललेला होता. अवघी पंढरी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम च्या सह विठ्ठल नामांच्या गजराने दुमदुमत होती. भगवंताच्या नामस्मरणाचा आणि कीर्तनाचा महिमा एखाद्या प्रांतात वारकरी या नावाने गाजत असेल, तर पुष्टी मार्ग या नावाने दुसऱ्या प्रांतात गाजत असेल, तर तिसऱ्या प्रांतात त्याला आणखी निराळ नाव असेल. प्रत्येकाच्या माथ्यावर सत्य, न्याय, परोपकार वगैरे अशा धर्माच्या महा सिद्धांताचा अनवरत वर्षाव होत होता. थोडक्यात काय तर संपूर्ण जनता अश्राप, श्रद्धाळू आणि पापभिरू होती, पण तरीदेखील अशा लोकांना पिढ्यानपिढ्या स्वातंत्र्यापासून वंचित राहावं लागलं, अब्रू गमावावी लागली, स्रीया गमवाव्या लागल्या, गुलामी मान्य करावी लागली, दारिद्र्याच्या नरकात खितपत पडावं लागलं आणि त्या पापींना श्री आणि विजय!
वर वर पाहिल्यावर ही एक विचित्रता भासते, पण त्या मागची मूळ कारण आपण समजून घेतली पाहिजेत. भागवत धर्माबद्दल आपल्यात तेव्हा जेवढी आढळनिष्ठा होती तेवढीच आढळनिष्ठा इंग्रजांनी स्वतःच्या जीवनात जपली आणि ती म्हणजे संघनिष्ठा. इंग्रजांचा तीनशे वर्षाचा इतिहास काढून बघा. इंग्रज माणूस कधीही आपल्या देशाशी बेईमान झालेला तुम्हाला दिसणार नाही. हे देशोदेशी फिरले, विविध पेहराव त्यांनी बघितले, त्या त्या पोशाखांची वर्णन सुद्धा त्यांनी नोंदवून ठेवलेली आहेत. कधीतरी हौसे खातर तसा पोशाख त्यांनी चढवूनही पाहिला असेल पण तो काही त्यांनी आपलासा केला नाही. स्वतःची अस्मिता त्यांनी नेहमी टिकून ठेवली. एक इंग्रज दुसऱ्या इंग्रजांशी लढलेला तुम्हाला आढळणार नाही. असलास तर तो अपवाद असेल. स्वतःची संघनिष्ठा त्यांनी सतत टिकवली आहे. प्राण गेला तरी स्वदेशाशी आणि संघाशी द्रोह केलेला नाही. समाजाला जिवंत ठेवणारी समाजाला जगवणारी ही निष्ठा म्हणजे संघनिष्ठा जिला ऐश्वर्या विद्या म्हणतात.
अत्यंत विचारपूर्ण आणि मार्मिक भाष्य केलं आहे. संघनिष्ठा आणि राजविद्या ह्या संकल्पना आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे मांडणीवरून स्पष्ट होते.
इतिहास साक्षी आहे की ज्या समाजाने एकता आणि सांस्कृतिक निष्ठा जपली, तो समाज भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीच्या शिखरावर पोहोचला. पण जिथे आपसातच फाटाफूट झाली, तेथे संस्कृती लयाला गेली आणि परकीय शक्तींनी त्याचा फायदा घेतला. भारतीय समाजाचा आत्मा म्हणजे संस्कृती, अध्यात्म आणि समर्पणाची भावना, जी संतांनी टिकवून ठेवली, पण एकतेच्या अभावामुळे आपल्याला परकीय आक्रमणांना सामोरे जावे लागले.
हा मुद्दा अगदी पटणारा आहे की इंग्रजांनी संघबद्धता आणि राष्ट्रीय निष्ठा यामुळे जगावर सत्ता गाजवली. त्यांनी आपली अस्मिता कधीच गमावली नाही. आपण मात्र त्याच वेळी आपली एकता विसरलो, त्यामुळे आपल्याला परकीय शक्तींच्या अधीन जावे लागले.
आजही जर आपल्याला वैभवशाली संस्कृती आणि आत्मनिर्भर समाज घडवायचा असेल, तर संघभावना, निष्ठा आणि एकतेचा मूलमंत्र आत्मसात करावा लागेल. नाहीतर आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मिता केवळ इतिहासाच्या पानांमध्येच सीमित राहील.
Comments
Post a Comment