Nachiketa, the one who persuades his father | वडिलांना समजावणारा नचिकेता
जोपर्यंत मानवी संस्कृती उभी राहत नाही तोपर्यंत दैवी संस्कृती येणार नाही, तेजस्विता येणार नाही आणि तेजस्विता येत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची चर्चा व्यर्थ आहे! आत्मा - अनात्मा याची चर्चा व्यर्थ आहे!
वाग्वैखरी शब्दझरी शास्त्रव्याख्यानकौशलम्|
वैदुष्यं विदूषां तद्वत् भुक्तये न तच मुक्तये||
म्हणूनच आत्मज्ञानाचा भक्कम पाया हा ईशभक्ती आहे. त्याशिवाय आत्मज्ञान शक्य नाही. त्यानंतर तेजस्वीता येते. अशी जर गोष्ट असेल तर अनुपश्य यथा पूर्वे... यासारखी गोष्ट वडिलांना सांगणारा नचिकेता इतका बालीश मुलगा नसणार. आपण हे मी केवळ माझं अनुमान म्हणून सांगत नाही त्यांचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्याने आपल्या वडिलांना जे समजावंल आहे त्यातून तुम्हाला असं दिसत काय की, हा मुलगा इतका बालीश असावा? नुसता चॉकलेट साठी हट्ट करणारा हा मुलगा आहे काय? यम राजाकडे गेल्यावर यमराजाची पत्नी त्याचा आदर सत्कार करायला तयार असूनही ज्याने नकार दिला आणि 'मी निष्ठावान मुलगा आहे. माझ्या वडिलांनी मला यम राजांना भेटायला सांगितलं आहे, तर जोपर्यंत यमराज मला भेटत नाहीत तोपर्यंत अन्न - पाणी घेणार नाही' असं बोलणारा मुलगा नक्कीच बालिश नाही.
दुसरं असं की, त्याच्या वडिलांना स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप झालेला आहे. 'आपण काय करून बसलो' असं त्यांना वाटलं आहे. पण तरीही हा मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय की, तुम्ही जे बोललात तसं आपण वागलं पाहिजे.' आपल्या वडिलांना हे असं समजावणारा मुलगा बालिश नाही; त्याचप्रमाणे वडील त्याच्यावर नाराज आहेत अशीही त्याची समजूत नाही. उलट, तो घरी सुखरूप गेला तर वडिलांना आनंदच होणार आहे याची त्याला खात्री आहे.
नचिकेत्याच्या वडिलांना पश्चाताप झाला होता आणि म्हणून त्यांनी मुलाला सांगितलंही होतं की, 'जाऊ नकोस.' परंतु नचिकेत्याचा पक्का निर्धार झालेला होता आणि त्यामुळे त्याने वडिलांना समजावलं आहे की, 'तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. 'सर्व असा सांगणारा मुलगा कोणत्या भूमिकेवर असेल ते लक्षात घ्या. म्हणून सांगतो की, 'माझ्या पित्याचा क्रोध शांत व्हावा असं वरदान द्या' अशी मागणी यमराजापाशी नचीकेत्याने केली असेल आणि ते चुकीचंही नाही, पण त्याचबरोबर थोडा विचार केला तर जाणवेल की त्याच्या वडिलांना तर राग तिळमात्र ही नव्हता. आणि ते नचिकेत्याला ही माहित आहे. तसंच नचीकेता एवढा बालिश नाही की यमराजा पाशी इतकी छोटीशी मागणी तो करेल. इथे दुसऱ्या एखाद्या बालिश मुलाने अशी मागणी केली तर समजू शकतो, पण नचिकेता पूर्णपणे समजदार मुलगा आहे असंही दिसतं. कारण की त्याने दुसऱ्या वरदानाने अग्नी तेजाची मागणी केली आहे आणि तिसऱ्या वरदानाने आत्मज्ञानाची मागणी केली आहे.
त्यामुळे माझा पिता - गौतम रागावले आहेत तर ते शांतसंकल्प: सुमनस: होवोत ही जी मागणी त्यांनी केली त्यात त्याला अपेक्षित पिता म्हणजे प्रभू - आकाशातला पिता आहे. संपूर्ण विश्व त्या पित्याने शांत संकल्पाने उभे केल आहे आणि त्यात सर्वांनी प्रसन्नतेने राहिलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. पण तरीही ते तसं झालेलं दिसत नाही. म्हणून 'माझ्या या पित्याचा क्रोध नष्ट होवो असं काहीतरी तुम्ही करावं' असं इथे नचिकेता म्हणतो आहे.
नचिकेत्याची कथा केवळ एका मुलाच्या हट्टाची नाही, तर ती एका तेजस्वी, बुद्धिमान आणि निष्ठावान मुलाच्या आत्मसंशोधनाची आहे. तो केवळ आपल्या वडिलांचा आदर करणारा मुलगा नाही, तर त्यांना सत्याच्या दिशेने मार्गदर्शन करणारा आहे.
त्याने वडिलांना समजावले की, उच्चतर मूल्यांसाठी आपले वचन पाळणे आवश्यक आहे. त्याचा हेतू केवळ स्वतःचं हित साधणे नव्हतं, तर वडिलांना आणि समाजाला एक मोठा धडा देणं होतं. तो बालिश नसून परिपक्वतेचा आदर्श होता—जो फक्त स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी विचार करत होता.
यमराजासमोरही त्याने हीच तेजस्विता दाखवली. त्याच्या मागण्या स्वतःच्या लहानशा स्वार्थापुरत्या नव्हत्या. त्याने आधी आपल्या वडिलांचा मानसिक स्थैर्याचा विचार केला, मग अग्नी-विद्येचा आणि शेवटी आत्मज्ञानाचा. यावरूनच दिसते की नचिकेता केवळ एखादा जिद्दी मुलगा नव्हता, तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर असलेला एक विचारवंत होता.
त्याच्या वडिलांच्या रागाचा तो उल्लेख करतो, पण तो फक्त बाह्य स्वरूपाचा भाग आहे. प्रत्यक्षात, तो जेव्हा ‘माझ्या पित्याचा राग शांत होवो’ अशी मागणी करतो, तेव्हा तो केवळ भौतिक पित्याबद्दल नव्हे, तर संपूर्ण विश्वव्यवस्थेतल्या अस्थिरतेबद्दल बोलत आहे. म्हणजेच, नचिकेत्याचा विचार आणि मागण्या केवळ कौटुंबिक पातळीवर नव्हत्या, तर त्यामध्ये संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा विचार दडलेला होता.
ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या ज्ञानासाठी, सत्यासाठी आणि धर्मासाठी निष्ठा असावी लागते. यासाठी केवळ शहाणपणच नाही, तर त्यागाची आणि धैर्याचीही आवश्यकता असते.
Comments
Post a Comment