Life and Skills | जीवन कौशल्ये
कलाकौशल्य कमी असतील तरी एकवेळ चालेल पण जीवन जगण्याची कला मुलाला साधलीच पाहिजे. भले तो अर्धी भाकरी मिळवेल, पण खुमारीत जगण्याची ताकद त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. याचं शिक्षण सर्वात प्रथम त्याला दिलं पाहिजे. आधी त्याचं मन तयार करा, त्याची वृत्ती तयार करा. मुलाला एक वेळ लिहिता - वाचता येत नसेल तर ते नंतरही पाहून घेता येईल; मुलात एखादी skills - त्याला कमी असेल तरी हरकत नाही, पण आधी त्याची जीवन वृत्ती तयार करा. वृत्तीवर्तन जीवने ही महत्त्वाची गोष्ट आहे. नचिकता म्हणतो आहे की, 'बाबा! अनुपश्य यथा पूर्वे आपले पूर्वज अटीतटीच्या प्रसंगांना कसे सामोरे गेले त्याचा तुम्ही विचार करा. तसंच प्रतिपश्य तथापरे - सध्याचे जे कोणते सद् पुरुष आहेत त्यांचे जीवन ध्यानात घ्या. म्हणजे तुमची शोकाविष्ठता कमी होईल. तुम्ही मला यम राजाला दिला आहे तर आता मला यम राजाकडे जाऊ द्या. त्यात कसला शोक करायचा?'
अशी ध्येयनिष्ठा आपल्या देशातल्या पूर्वजांनी दाखवलेली आहे. राजा हरिश्चंद्र ने स्वप्नात दिलेले वचन पाळण्यासाठी आपल्या राज्यावर पाणी सोडलं. तेव्हा तारामती किंवा रोहिदासांनी अशी तक्रार नाही केली की, 'हे राज्य तर आमच्या आजा पंजोबानी कमावलेलं होतं जे वडिलांना वारसाने मिळालेला आहे, तेव्हा त्यांच्यावर माझाही हक्क आहे की नाही?' हरिचंद्र निघाला तसे त्याच्या पाठोपाठ तारामती आणि रोहिदास सुद्धा निघाले. त्यांनी भौतिक संपत्ती गमावली असेल, पण हृदयाची संपत्ती टिकवली आहे. त्यांनी पैशाचे वैभव गमावले असेल, पण प्रेमाचं वैभव, कौटुंबिक वैभव टिकवल आहे. पत्नीचे पतिवरचे प्रेम, पतीचे पत्नीवरच प्रेम, मुलांचं माता-पित्यावरच प्रेम हे जीवनात विकत किंवा उसने मिळत नाही. आणि ते बाहेरूनही उभं करता येत नाही. आणि म्हणूनच तर क्षुद्र संपत्ती आणि वैभवाकडे ढुंकूनही न बघता तारामती आणि रोहिदास दोघेही हारिश्चंद्रा सोबत निघून गेले आहेत. आकांक्षा, चिरंतन जीवन निष्ठेचा आग्रह मानवी जीवनात असला पाहिजे. तो या लोकांनी टिकवला आहे, सांभाळला आहे. म्हणून तर ते जंगलात देखील सुखाने राहू शकले आहेत.
'पाच लाख रुपये वारसा काय माणसाला अपसुक मिळाले की माणूस सुखी होईल' ही भ्रांत कल्पना आहे. ज्याने कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थळी आपली जीवन निष्ठा सांभाळली आहे तोच सुखी होऊ शकतो. असं spirit अशी हिम्मत जीवनात उभी करता आली पाहिजे. संपूर्ण कठोपनिषद spirit हिंमत देणार वाग्मय आहे. मारण्याची तयारी दाखवण्याची हिंमत कोण निर्माण करेल? त्याच्यासाठी तेजस्विता देणारे शिक्षण मिळालं पाहिजे. तुमच्यात किती प्रकारची skills (कला कौशल्य) आहेत? तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत? हेच फक्त बघाल तर त्यातून सगळे मुडदे तयार होणार. या skills education मुळे फक्त bookworms पुस्तके कीडे तयार होतील, नाहीतर मवाली बनतील. या अशा साचेबद्ध शिक्षणातून हे दोनच रस्ते बाहेर पडतात. केवळ धष्टपुष्ट शरीर बनवून दुसऱ्यावर हात उगरण्याची तयारी राखली म्हणजे त्याला तेजस्विता नाही म्हणत, मवालीपणा म्हणतात. आता माणसाने ठरवायचं आहे की मी कोणत्या रस्त्याने जायचे?
आमच्या शास्त्रकारानी मधला एक समन्वयात्मक मध्यबिंदू सांगून ठेवला आहे. अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथापरे च्या आधारे आपल्या शास्त्रकाराने प्रत्येक बाबतीत spirit हिमतीला किंमत दिली आहे. हिमतीला मोठ महत्त्व आहे. त्यात विशिष्टता आहे. तसेच जीवननिष्ठा निर्माण करण्यासाठी शास्त्रकार सांगतात, पूर्वजांचे स्मरण ठेवा. ते कोण कोणत्या स्थितीत कसे कसे राहिले ते जाणून घ्या, समजून घ्या. त्याचप्रमाणे सद्य परिस्थितीत जे जे सत्पुरूष आहेत त्यांचं वर्तन कसं आहे त्याचा विचार करा. ही गोष्ट समजावून नचिकेता सांगतो आहे की, 'बाबा! शोक सोडून द्या आणि मला पुढे जाऊ द्या.'
ही विचारधारा जीवनाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारी आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत कौशल्ये आणि मार्क्स यांवरच भर दिला जातो, पण जीवन कसे जगायचे, संकटकाळात कसे उभे राहायचे, आत्मबळ कसे निर्माण करायचे, हे शिकवले जात नाही. नचिकेतासारखी जिज्ञासा आणि हरिश्चंद्रासारखी निष्ठा हीच खरी संपत्ती आहे.
भौतिक सुखांपेक्षा मूल्यांवर आधारलेली वृत्तीच माणसाला खऱ्या अर्थाने सुखी करते. हिमतीला, जीवननिष्ठेला आणि आत्मबळाला शिक्षणात स्थान दिले तरच खऱ्या अर्थाने तेजस्वी पिढी घडेल. "अनुपश्य यथा पूर्वे, प्रतिपश्य तथापरे" या शिकवणुकीतून आपल्याला पूर्वजांची शिकवण घेऊन वर्तमान परिस्थितीत योग्य दिशा कशी घ्यायची, हे समजते.
तुम्हाला काय वाटतं—आजच्या पिढीला हे मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी कोणते practically उपाय करता येऊ शकतील?
Comments
Post a Comment