The True Value of Culture and Life Values | संस्कार आणि जीवनमूल्यांची योग्य किंमत
सत्कुले योजयेत् कन्यां पुत्रं विद्याषु योजयेत् | व्यसने योजयेत् शत्रूं इष्टं धर्में नियोजयेत्||
सगळं अगदी पद्धतशीर लिखाण आहे आपल्या शास्त्रात. मुलीला कुठल्या घरात द्याल? पै - पैसा कमी असला तरी हरकत नाही. पण मुलीला सत्कुळात द्या. सत्कुले योजयेत् कन्याम्| सत्कुळ आणि चांगली बुद्धी असणाऱ्याला मुलगी द्या. चांगली बुद्धी असेल अशाच मुलाला कन्यादान करा. तसेच मुलाला काय द्याल? ज्ञान टिकवण्यासाठी आपलं शास्त्र सांगते, मुलाला सद्विद्या द्या, सद्विचार द्या. ज्या विद्याने मुलगा ताठ मानेने जगू शकेल, ज्या विद्याने सुखी भाकरी खात असला तरी ती तत्त्वज्ञानात बुडवून खात असल्याने त्याचे गाल टोमॅटो सारखे लाल राहतील, अशी विद्या त्याला द्या. अशी विद्या आणि विचारधारा देण्याचे काम बापाचे आहे. जो बाप मुलाला उपनिषदाची संगत मिळून देत नाही तो बाप आपलं कर्तव्य करत नाही. उपनयन म्हणजे गीता आणि उपनिषद यांच्या पाशी मुलाला घेऊन जाणं. गीता आणि उपनिषद यांचा अभ्यास करण्यासाठी मुलगा आपण होऊन जायचा नाही. त्याला घेऊन जावं लागतं. जो बाप मुलाला तिथे घेऊन जात नाही तो गुन्हेगार आहे, पापी आहे. राजाच्या कायद्याचे उल्लंघन कराल तर गुन्हेगार आहात आणि या यम - नियमांचा उल्लंघन कराल तर पापी गणले जाल.
पुढे सांगतात जो शत्रू असेल त्याच्या समोर संकट उभं करा. सगळेच काही बुद्ध किंवा वशिष्ठांच्या पातळीला पोहोचलेले नसतात. त्यामुळे वेदांमध्ये सगळ्यांना सगळ्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल असे विचार तुम्हाला मिळतील. तामस माणसाला देखील त्यात मार्गदर्शन केलेले आहे. म्हणूनच तर वेदांमध्ये सांगितले आहे की - जो माझा व्देष करतो त्याचा मी उच्छेद करीन. कारण की उन्नत विचारधारा तत्काळ जीवनात उतरवन सगळ्यांना शक्य नाही. जोपर्यंत सगळ्यांचं जीवन तेजस्वी बनणार नाही तोपर्यंत नुसतेच उन्नत विचार बोलणारा माणूस दंभी आहे. म्हणून सांगतात की व्यसने योजयेत् शत्रूम्|
पुढे म्हटले आहे, जे आपल्याला प्रीय असेल त्याचा दानधर्म करा. आपल्याला आवडत नाही त्याचा दानधर्म कराल तर तो धर्म नव्हे. शठ्यतेने दानधर्म करणारा माणूस अपंडित, मूर्ख आहे. खरे तर ज्यांनी स्वतः धर्म काय हे लिहून ठेवला आहे तो भगवान माणसाचं ह्रदय पुरेपूर ओळखून आहे. माणसाच्या हृदयात स्वार्थ आहे, कीर्तीची इच्छा आहे, लोकेषणा आहे; मात्र तो अवघ्या दुनियेला दाखवतो आहे की त्याची charity' दान आहे. पण तुम्ही दुनियाला बनवला तरी भगवंताला बनवू शकणार नाही. हा जीवन व्यवहार बनू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी शठ्य आलं तिथं धर्म खलास. धर्माचा संबंध लोकांशी नाही, त्याचा direct संबंध भगवंताशी आहे. त्यामुळे नाही चालणार.
पुढे सांगितलं आहे, कपटेन मित्रम् मित्र आत्मसात् करायचा असतो. मित्रासोबत मैत्रीच केली पाहिजे. पण मी जर त्याच्याशी कपट केलं तर मी मूर्ख माणूस आहे. अशी मैत्री टिकत नाही. जो मित्राशी कपट करतो तो अपंडित आहे. अरे, विश्वासाने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं तोच जर डोकं उडवून देईल, निस्तेज बनवेल, शूद्र बनवेल, कपट करेल तर त्याच्याशी मैत्री टिकणारच नाही. आणि तरी देखील मैत्री टिकेल असं समजणारी माणसं अपंडित, मूर्ख आहेत. ध्यानात ठेवा असं आपलं शास्त्र सांगत आहे. म्हणूनच नितीशास्त्र सांगत शाठ्येन धर्म कपटेन मित्रं परोपतापेन समृद्धिभावम् - दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याला पिडा देऊन, ताप देऊन तुम्ही जर तुमची समृद्धी साधू पहात असाल तर ते शक्य नाही.
सुखेन विद्याम् - विद्या सुखाने, विना सायास मिळते अशी तुमची कल्पना असेल तर ती खोटी आहे. विद्यार्थ्याला दुःख असलंच पाहिजे. जर दुःख नसेल तर ते उभं करा. तू विद्यार्थी आहेस तर स्वहताने जेवण बनव. आजकाल विद्यार्थ्यांना सगळ्या सुख सुविधा दिल्या पाहिजेत अशी मान्यता समाजात पसरली आहे. पण कोणालाही मानसशास्त्राचा जरा देखील अभ्यास नाही. अमेरिकेमधल्या होस्टेलमध्ये मुलांना स्वतंत्र खाटा असतात, स्वतंत्र बेड लॅम्प असतात तर आपल्याकडे पण अशा सुविधा पुरवल्या पाहिजेत असं आपण बोलायला लागलो आहोत. मोर नाचला म्हणून लांडोर पण नाचायला निघाली! अरे, आपल्याकडच्या मुलांची परिस्थिती निराळी आहे. आपल्या देशात सामान्य कुटुंबांमधून आलेली मुलं असतात. आपल्याकडे एकेका कुटुंबात एकाच खोलीत आपण सहा - सहा लोक राहत असतो. म्हणून मग होस्टेलमध्ये पण मुलांनी अशाच प्रकारे राहायची सवय ठेवली पाहिजे. नाही तर घरी गेल्यानंतर ही मुलं मग सामान्य कुटुंबात एकरूप होऊ शकत नाहीत आणि त्या पापाचे आपण धनी होतो. 'विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत' असं बोलणाऱ्या लोकांना मानसशास्त्रातला ओं की ठो माहित नाही. एखादा म्हणतो, ' मी माझ्या मुलाला किती सुख सुविधा करून दिल्या होत्या, तरी देखील तो नापास झाला.' अरे, म्हणूनच तो नापास झाला! थोडी आच लागली ना तर बघा तो पास होतो की नाही. भले तुमच्या घरी दोन दोन आचारी असतील, बाकी सगळं असेल पण जोवर मुलगा ग्रॅज्युएट होत नाही तोवर त्याने स्वतःच्या हाताने जेवण बनवून मग जेवला पाहिजे. आज कालच्या बापाला यात निष्ठुरता वाटेल. आज आई-बाबांचा दुबळा अंकुश हीच समस्या आहे पण विद्या मिळायला हवी असेल तर अशा अडीअडचणींचा सामना केलाच पाहिजे.
आपल्या शास्त्रात सांगितलेली जीवनशैली आणि नीती शिकवण फारच प्रगल्भ आणि तर्कशुद्ध आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ठरावीक विचार आणि पद्धतीचा उल्लेख केलेला आहे, ज्यामुळे व्यक्तीचे आणि समाजाचे योग्य प्रकारे कल्याण साधता येईल.
1. मुलीचे कन्यादान:
मुलीचे कन्यादान करताना तिचे भविष्य चांगल्या घरात जाईल, जिथे संस्कार आणि सद्विचार असतील, याकडे लक्ष द्या. पैशापेक्षा चांगल्या कुटुंबातील मुलगा निवडावा. धन संपत्ती नष्ट होऊ शकते, पण सद्गुण आणि ज्ञान टिकते.
2. मुलाला विद्या:
मुलाला चांगले शिक्षण आणि विचारधारा देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. जीवनाच्या संघर्षांसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची भेट त्याला द्यावी. त्याला केवळ शालेय शिक्षण नव्हे, तर त्याच्या मनाला आणि आत्म्याला उन्नत करणारे शिक्षण मिळायला हवे.
3. शत्रूंचे व्यवस्थापन:
शत्रूंचे सामोरे जाताना त्यांना त्यांच्या दुर्बलतेत अडकवून ठेवायचे आहे. हे तामसिक वाटले तरी कधी कधी न्यायाच्या बाजूने उभे राहण्यासाठी ही कृती आवश्यक असते.
4. धर्म आणि दान:
दान कसे करावे याचेही स्पष्ट मार्गदर्शन आहे. खऱ्या आनंदाने आणि आपुलकीने केलेले दानच धर्म मानले जाते. कपटाने किंवा दिखाव्यासाठी केलेले दान व्यर्थ ठरते.
5. मैत्रीतील निष्ठा:
मैत्री टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. जो मित्राशी कपट करतो, त्याच्याशी मैत्री टिकत नाही. मैत्री ही विश्वास आणि निष्ठेवर आधारलेली असते.
6. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शिस्त:
विद्यार्थ्यांच्या जीवनात संघर्ष आणि साधेपणा असावा, असे सांगितले आहे. सुखसोयींनी भरलेले जीवन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवत नाही. अडचणींचा सामना केल्यानेच खरे शिक्षण मिळते, आणि आत्मनिर्भरता निर्माण होते.
ही शिकवण आजच्या काळातही लागू पडते. संस्कार, शिस्त, संघर्षातून शिकणे, आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेणे ही मूल्ये कालातीत आहेत.
Comments
Post a Comment