ही सृष्टी चोरांची नसून सज्जनांची आहे, आणि सज्जनांसाठीच बनवलेली आहे.
अहमन्नम् - हे अन्न माझ्यायोगेच आहे. अख्ख्या जगातले अन्न माझे आहे. त्याचप्रमाणे अख्ख्या जगातल्या अन्नाला महत्त्व हे मी दिलेले आहे.
अन्नाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे भौतिक अन्न, म्हणजे वैभव. हे सगळे वैभव त्याचेच तर आहे. अरे! तो म्हणजेच वैभव! ज्याच्या वैभवामधून भगवंत वजा झाला आहे ते वैभव कसले? पण अशा प्रकारच्या पिशाच्चांमध्ये देखील काही सिद्धी असतात हे जरी खरे असले तरी यांच्या जीवनातून भगवान वजा झाला आहे त्याच्या वैभावाला किंमत नाही. अशी पुष्कळ वैभवसंपन्न माणसे जगात दिसतात. पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हालत नाही. तोच खरा वैभववान की ज्याला 'मी' चे वैभव लाभले आहे. ज्याला 'माझे' वैभव मिळाले आहे. असा वैभवसंपन्न माणूस ज्याच्या घरी आला असेल त्याच्या घरी वैभव येते. असा वैभव संपन्न माणूस आपल्या घरी आला की वैभव सोबत यायचेच.
दुसऱ्या अन्नाचा प्रकार आहे भावनेचे अन्न. जगामध्ये ही जी भावना उभी राहिली आहे त्याचे कारण म्हणजे हा Superman. खुद्द भगवंताची या महान माणसावर भावना जडलेली असते. जगदीश सगळ्या जगाकडे जो भावनेच्या दृष्टीने बघतो, आत्मीय दृष्टीने बघतो ते या त्याच्या लाडक्या लेकाच्या खातर. आपल्या लेकाच्या भल्याची त्याची इच्छा असते. आणि म्हणून त्या भगवंताच्या लाडक्या लेकाच्या जीवावर या सगळ्या खुपट्या - फाटक्या लोकांना खायला मिळते.
हे चंद्र - सूर्य कोणासाठी आहेत? असा जो कोणी भगवंताचा लाडका मुलगा आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्या रस्त्याने जाणारी जी कोणी माणसे असतील त्यांच्यासाठी! अरे, त्याला उपनिषद वाचता यावे म्हणून हा प्रकाश पसरला आहे! मग तुम्हाला त्या प्रकाशात गूळ विकायचा असला तर त्याला ना नाही; पण ओळखण्यासाठी हा प्रकाश आलेला नाही. सूर्याचा जो प्रकाश आला आहे तो अशा माणसाला बघता यावे यासाठी आला आहे. तो अवघी सृष्टी केव्हा पाहील? एवढ्यासाठी हा प्रकाशाला आहे. त्याचा उपयोग तुम्हीही करा, त्याला ना कुठेय? जगदीश जो या जगाकडे भावनेने बघतो आहे ते या त्याच्या लाडक्या मुलांसाठीच!
तिसरे अन्न आहे, आत्मिक अन्न - प्रभूची आणि जीवाची तादात्म्यता. हे जे आत्मिक अन्न आहे ते सुद्धा मी आहे असे इथे त्याने सांगितले आहे. हे जगदीशा सोबत तादात्म्य साधण्याचे काम तर याच माणसांनी केलेले आहे.
कुलं पवित्रं जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवती च येन|
अपारसंसारसमुद्रमध्ये लिनं परे ब्र्हाणि यस्य चेत:||
अरे त्याला जन्म देऊनच कुल पवित्र झाले, जननी कृतार्थ झाली आणि तो जन्माला आला त्यामुळे अवघी वसुंधरा पुण्यवती झाली. सुगंध येतो तिला! या जगात राहण्याची इच्छा होते त्याचे कारण काय? इथे याज्ञवल्क्य राहिले, इथे राम - कृष्ण राहिले. हे सगळे लोक इथे राहिले, म्हणून इथे राहण्याची इच्छा होते. पृथ्वी पुण्यवती बनली आहे ती त्यांच्यामुळेच. नाही तर या चोरांच्या दुनियेत राहील कोण? पण खरी तर ही चोरांची दुनियाच नाही. सजनांचीच दुनिया आहे. सज्जनाने बनवलेले दुनिया आहे आणि सज्जनांसाठी बनवलेली ही दुनिया आहे. त्यात येऊन हे चोर राहिले आहेत. अशी या दुनियेची वस्तुस्थिती आहे.
वरील लेखात अन्नाच्या तीन प्रकारांवर (भौतिक, भावनिक आणि आत्मिक) विचार मांडण्यात आले आहेत.
1. भौतिक अन्न (वैभव)
भौतिक अन्न म्हणजे जीवनातील ऐहिक सुखे, संपत्ती, आणि वैभव. परंतु, हे वैभव भगवंताशिवाय अपूर्ण आहे. खरे वैभव तेच आहे जे "मी" च्या आत्मिक अनुभूतीने भरलेले आहे. ज्या व्यक्तीकडे अशी वैभवश्री आहे ती व्यक्ती जेथे जाते तेथे समृद्धी घेऊन येते.
2. भावनिक अन्न (भावना)
भावना हे अन्न म्हणजे जीवनातील प्रेम, कृतज्ञता, आणि दयाळूपणा. जगातील प्रत्येक संवेदना आणि भावना भगवंताच्या लाडक्या लेकासाठी आहे. भगवंत स्वतः आपल्या लेकराच्या भल्यासाठी कार्यरत असतो, त्यामुळेच इतर माणसांचे जीवनही चालते. चंद्र-सूर्य आणि सृष्टीतील सर्वकाही अशा व्यक्तीसाठी आहे जी भगवंताशी आत्मीयतेने जोडलेली आहे.
3. आत्मिक अन्न (तादात्म्य)
आत्मिक अन्न म्हणजे भगवंताशी आणि आत्म्यासोबत तादात्म्य साधणे. भगवंत आणि जीव यांच्यातील एकात्मता हेच आत्मिक अन्न आहे. यामुळेच मनुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतो.
श्लोकात सांगितल्याप्रमाणे, जो सज्जन आहे त्याच्या जन्मामुळेच त्याचे कुटुंब, माता, आणि पृथ्वी पवित्र होते. सज्जन व्यक्तीच या पृथ्वीला दिव्यता आणि सुंदरता प्रदान करतात. ही सृष्टी चोरांची नसून सज्जनांची आहे, आणि सज्जनांसाठीच बनवलेली आहे.
या विचारांनी मानवाच्या जीवनाचे खरे महत्त्व आणि उद्दिष्ट उलगडून दाखवले आहे.
Comments
Post a Comment