गीता जयंती - गीतेची विशेषता

     
आजपासून साधारणता पाच हजार वर्षांपूर्वी, मार्गशीर्ष, शुद्ध एकादशीच्या मंगल प्रभाती, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखावर विंदातून गीतेचा ज्ञान प्रवाह स्रवला, भारताला गीते सारखा अमूल्य ग्रंथ लाभला. त्यानंतर तो दिवस, भारताच्या ज्वलंत सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णपान बनून राहिला. केवळ भारतातीलच नाही, तर सर्व विश्वातील सुज्ञ लोक भावपूर्ण अंतकरणाने, गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी साजरा करतात. कोणत्याही ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित समग्र विश्वात त्याचीच आगळी विशेषता समजली जात असेल.
     
गीता म्हणजे योगेश्वर कृष्णाच्या  मुखारविंदातून स्रवलेले माधुर्य व सौंदर्य यांचे वाङ्मयीन स्वरूप. भगवान गोपाल कृष्णाच्या प्रेम मुरलीने गोकुळातील सर्वांना मुग्ध केले तर योगेश्वर कृष्णाच्या ज्ञान मुरली की त्याने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक ज्ञानी, भक्त, कर्मयोगी, ऋषी, संत, समाजसेवक किंवा चिंतक मग तो कोणत्याही देशातला अथवा काळातला असो, धर्माचा किंवा जातीचा असो त्या सर्वांना तिने मुग्ध केले आहे. 'कृष्णस्तु भगवान स्वयं' मुखातून निघालेल्या या वाङ्मयाने मानवाला जीवन जगण्याची हिंमत दिली आहे.
     
जीवन एक संग्राम आहे आणि म्हणून गीतेच्या कुरुक्षेत्रावरील रणभूमीमध्ये गीतेचे गायन हे एका सुयोग्य पार्श्वभूमीची निर्मिती आहे. भगवंताने अर्जुनाला निमित्त बनवून, विश्वातील मानव मात्राला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याच चिरंतन प्रयास केलेला आहे, जीवन रडण्यासाठी नाही, पळून जाण्यासाठी नाही, जीवन हसण्यासाठी आहे तसेच अखंड आशा व अतुट श्रद्धा यांचा विकास करण्यासाठी आहे. तो मानव मात्राला जीवनात प्रत्येक क्षणी येणाऱ्या लहान मोठ्या संग्रामात हिंमतीने उभे राहण्याची शक्ती देतो.
      
कोणत्याही विशिष्ट धर्म, संघ किंवा संप्रदाय यांच्या नादाला न लागता गीताकाराने मानव - जीवनातील चिरंतन मूल्यांना गीतेत गुंफले आहे. असा अमूल्य ग्रंथ मानव मात्राला देऊनही कृष्णाची केवढी अद्भुत नम्रता आहे! भगवान स्वमुखाने सांगतात, यात माझे काहीही मौलिक नाही. 'ऋषिभिर्बहुधा गीतं .' ऋषींनी जे अनेक वेळा, अनेक प्रकाराने गायलेले आहे, तेच मी पुन्हा सांगत आहे. भगवंताच्या या नम्रतेवर प्रसन्न होऊन गायलेल्या एका स्तोत्रात श्रीमद अद्य: शंकराचार्याने भगवान श्रीकृष्णाला 'मेघसुंदरम्' असे ब्रिद लावले आहे. समुद्रातील पाणी खेचून बनलेल्या मेघातील पाणी भले त्याचे स्वतःचे नसेल पण गोडी मात्र त्याची स्वतःची आहे. आज कदाचित ज्ञान, विचार स्वतःचे नसतील तरीही गीतेचे जे आगळे माधुर्य आहे ते कृष्णाचे स्वतःचे आहे. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. वास्तविक पाहता तो एक तत्त्वज्ञानाचा अमूल्य ग्रंथ आहे. 'तुमचा धर्मग्रंथ कोणता?' असे विचारून आपले चेष्टा करणाऱ्या लोकांना आपण हिमतेने सांगू शकतो की, गीता हा आमचा विश्वधर्म - ग्रंथ आहे. गीता भगवंताने स्वमुखाने गायलेली आहे. हेच तिचे वैशिष्ट्य आहे. वेद व्यासाने नंतर महाभारतात गीतेला ग्रंथीत केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन