जशी वृत्ती असेल तशी गती मिळेल
तुम्ही जिवन कसे जगलात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता ठेवलात त्याप्रमाणे तुमची वृत्ती बनेल आणि मरण समयी माणसाची जशी वृत्ती असेल तशी गती मिळेल. हा मानवी जीवनाचा जमा - खर्च आहे. म्हणून जीवनाचा खरा दृष्टिकोन जोपासण्याची सुरुवात आज पासूनच करायला हवी.
मेल्यावर सर्वांचे चैतन्य प्रभूपाशीच जाते. पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी समज असते.
भक्तांना मरण म्हणजे प्रभूमिलन वाटते. तत्त्ववेत्यांना मरणात आत्मप्रतिती दिसते. कर्मयोग्यांना मरण म्हणजे विश्रांती वाटते. आणि सामान्य लोकांना मरण म्हणजे कर्माचा न्यायप्रसंग आहे असे वाटते.
भक्तांना वाटते की मरण म्हणजे प्रभूशी मिलन. सकाळी उठताच प्रभू डोळ्यात शक्ती भरतो, त्यांना कामी लावतो आणि जीवनाचा व्यवहार सुरू होतो. जर तुम्ही तुमच्या मित्राला रोज भेटायला जाता तर एखादे दिवशी तुमचा मित्र तुम्हालाही भेटायला येईल की नाही? अशाच प्रकारे तीनशे पासष्ट दिवस आणि ऐंशी वर्ष रोज भगवान इथे भेटायला आला तर एक दिवस मी त्याला भेटायला जाईन. याचे नाव मरण असे भक्तांची समजूत असते.
तत्वेत्यांसाठी मरण म्हणजे आत्मप्रतीति असते. जीवन एक सावली, छाया आहे आणि छाया कधी खरी नसते. त्यांच्या दृष्टीने जीवन सत्य नाही. आत्मशक्ती सत्य आहे. म्हणून त्यांना मरण म्हणजे आत्मप्रतीति वाटते. तत्त्ववेत्ता आणि भक्ताच्या मरणाच्या दृष्टिकोनात फरक आहे.
भक्ताची समज असते की भगवंत माझा धनी आहे आणि मी त्याची पत्नी आहे. पत्नी पतीच्या घरी जाते आणि घराचा कब्जा घेते. तत्त्ववेत्ता या प्रकारचे मिलन मानतच नाही. तो आत्मप्रतीति मुळे अहं ब्रह्मास्मि असेच समजतो. 'मी एकटाच आहे' तो तर असेच म्हणतो की घर माझेच आहे.
Comments
Post a Comment