सृष्टीची हीच तर विचित्र गोष्ट
जीवनाबद्दलचे प्रेम केव्हा वाढते? जीवनात माझ्यासोबत माझा जोडीदार, माझा साथीदार माझा भगवंत आहे अशी जाणीव निर्माण होते तेव्हा. पती मिळालेल्या स्त्रीला आनंद असतो तसा आनंद, जिला पती नाही अशा स्त्रीला नसतो. पती आहे म्हणून तर स्री, पत्नी बनून सासरी जाते आणि तिथे विहिरीवरून पाणी शेंदून भरते, कपडे धुते, भांडी घासते, त्याची सर्व कामे करते. ते करण्यात तिला आनंद आहे. ती सर्व दुःख सहन करण्यास तयार असते. पण पती नसला तर हे सर्व तिला ओझे वाटते. ते करण्यात तिला आनंद होत नाही. 'जगत दुःखाने भरलेले आहे म्हणून जन्म घेणे हे दुःख आहे' असे कोणी म्हटले तर तो विद्वान लगेच म्हणेल, 'त्यात काय? मी दुःखे भोगायला तयार आहे.' त्यांचे जीवनावर प्रेम आहे. विद्वानाला मृत्यूचे भय नाही.
वेदांत सांगतो, जीवन खोटे आहे आणि मृत्यू अटळ सत्य आहे. म्हणजे काय नुसते मरून जायचे? अरे, मरणे तरी कुठे सहज आहे? एकदा 'मला मरायच आहे' असे म्हणत नदीमध्ये आत्महत्या करायला निघालेला एक माणूस लगेच परत आला. त्याला विचारले की, 'तू मरायला गेला होतास ना? मग परत कसा आलास? तर तो म्हणाला, पाणी फार थंड होते. आज थंडी जास्त आहे. उद्या थंडी कमी झाली की मरायला जाईन.' मरायला जाणे ही सहज सोपी गोष्ट नाही. या सृष्टीची हीच तर विचित्र गोष्ट आहे.मरायला निघालेला मरत नाही आणि जीवनाची आसक्ती असलेला केव्हा निघून जातो ते कळत नाही.
Comments
Post a Comment