जगत् 'माझे आहे' याची समज आणि जीवनात निर्भयता, प्रेमात उत्कटता व तारूण्याला ध्येय मिळाले तर!

   
   
'मी दोन दिवसाचा पाहूणा आहे असे समजणे ही पहिली पायरी आहे. अहं ब्रह्मास्मी असे विपरीत अर्थाने कोणी समजला तर अनर्थ होईल. वसिष्ठ अहं ब्रह्मास्मिची अनुभूती पावलेले होते. तसा दुर्योधनही स्वतःला अहं ब्रह्मास्मि समजत होता. एकाच विचारधारेची ही दोन अंतिम टोके आहेत. गीताकार अशांचे वर्णन करतात. ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी| काही माणसे सुरुवातीला असे समजतात की घर माझेच आहे. मला येथून जायचेच नाही. अशा लोकांसाठी शास्त्रकारानां समजावावे लागते, 'अरे बाबा! हे जगत तुझे नाहीच, प्रभूचे आहे आणि तू इथे दोन दिवसाचा पाहूणा आहेस.' ही गोष्ट समजून, जीवनात उतरावयाची आहे. त्यामुळे जीवन परिवर्तन होते, दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर त्याला दुसरी पायरी समजावी लागते की ही सृष्टी भगवंताची आहे हे खरे, पण याचा अर्थ ती तुझी नाही असे नाही. तू जर भगवंताचा मुलगा झालास तर ती तुझीही आहे. या जाणिवेने भय कमी होते. नंतर अत्युच्च दृष्टी येते ती ही कि मी नाहीच, भगवंताची ही लीला आहे आणि त्यात 'मला' पाठवून दिलेले आहे. बाकी तर तोच वेगवेगळी रुपे घेऊन खेळत राहिला आहे. हे जगत् जोपर्यंत तुम्हाला तुमचे वाटत नाही तोपर्यंत निर्भयता येणार नाही. म्हणून हे जगत् 'माझे आहे, माझ्या बापाचे आहे, मी माझ्या घरात आहे' असे जो समजतो तो निर्भय. जो प्रभूचा झाला तो निर्भय, मृत्यूचेही त्याला भय नसते. 
       
झोप ही गोष्ट भयंकर नाही तर मरण भयंकर कसे असेल? कोणी झोपला तर घरातील माणसे काय रडत बसतात? माणसाच्या जीवनातला आनंद नष्ट होण्याच्या आधीच भगवान त्याला घेऊन जाईल तर चांगले, कारण मरण काही भिती बाळगण्यासारखी गोष्ट नाही.
     
जो भगवंताचा झाला तो सर्वच बाबतीत निर्भय असतो. जीवनाच्या बाबतीत, अजिविकेच्या बाबतीत किंवा मानहानीच्या बाबतीत - सर्वच बाबतीत तो निर्भय असतो. अशा लोकांना कोणी तलाठी पद दिले नाही तर तो काय रडत बसणार आहे? हेडकलार्क बनवले नाही म्हणून तो काय रडत बसणार आहे? एखाद्या बंगल्यात प्रवेश करायचा असला तर त्या बंगल्याच्या मालकाशी तुमची ओळख असेल तर तिथे तुम्ही निर्धास्तपणे फिरू शकता‌. तिथल्या गुलाबांना हातही लावू शकता. पण त्या मालकाशी ओळख नसली तर त्याच्या बंगल्यात प्रवेश करताना तुम्हाला सतत भीती वाटत असते की माळ्याने विचारले तर? किंवा पाळलेला कुत्रा कुठून आला तर? त्याचप्रमाणे सृष्टीकर्त्याशी आपण संबंध जोडलेला असला तर भीती वाटत नाही.

 तारुण्यात जीवन जगायचे तर उत्कटता हवी. उत्कटता हे जीवनाचे सर्वस्व आहे. 'सीते, सीते' अशा हाका मारत पशु-पक्षांना वेड्यासारखा तिचा ठावठिकाण विचारणारा, वृक्ष-वल्लरीनां आलिंगन देऊन 'माझी सीता तुम्ही पाहिली आहे का?' असे विचारणारा राम 'तरुण' होता. 
   
प्रियेसी साठी सर्वस्व फेकून देणारा रोमिओ 'तरुण' होता. ज्या राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता असे साम्राज्य सोडण्याइतकी प्रेमाची उत्कटता इंग्लंडच्या आठव्या एडवर्ड मध्ये होती. सामान्य क्षुद्र, वैषयीक प्रेमातही तरुण उत्कट असतो. त्यासाठी बापाच्या लाखोंच्या संपत्तीवर पाणी सोडतो की, 'मला हिच्छाशीच लग्न करायचा आहे.' बाप म्हणतो, 'ती आपल्या जातीची नाही. मी तुला तिच्याशी लग्न करू द्यायचा नाही. आणि जर करशील तर माझी जी पाच लाखांची दौलत आहे ती तुला मिळायची नाही.' लेक म्हणतो, 'नको मला तुमची दौलत.' ही उत्कटता आहे. या उत्कट्याला जर योग्य प्रेम दाखवाल, निष्ठा द्याल, ध्येय द्याल तर ती योग्य मार्गाने जाईल. तरुणाची एक वृत्ती आहे की जी एखादी गोष्ट एकदा तो पकडेल तिच्यासाठी अवघ्या दुनिया वर तुळशीपत्र ठेवायची त्याची तयारी असते. ही उत्कटता आहे.
     
अशाच प्रकारे तरुणांच्या हृदयात ध्येयाखातर मरण्याची ही तयारी असते. तरुण मरणात जीवन पाहतो. 'गगनाला गवसणी घालीन.' 'माझ्या ध्येयासाठी हिमालयाचे चूर्ण करीन'. अशा प्रकारची उत्कटता तुम्हाला तरुणातच बघायला मिळेल. असे तारुण्य वयाच्या हिशोबाने मोजता येत नसते. कारण तारुण्य हे एक सुवर्णमौत्तिक रसायन आहे. ते पचले, अंगी लागले तर तेज देते, सामर्थ्य देते, पण जर नाही पचले तर विकृती निर्माण करते.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन