चांगल्याने चांगल्यासाठी चांगल्या पद्धतीने केलेली कृतीला सुकृत म्हणतात.
सुकृत शब्दाचे तीन अर्थ आहेत.
1)चांगल्या पद्धतीने केलेली कृती.
२) चांगल्याने केलेली कृती. आणि
३) चांगल्यासाठी केलेली कृती.
ही सृष्टी सुकृत आहे म्हणजेच चांगल्या रीतीने, दोष रहित केलेली अशी कृती आहे. जगतात कोणत्याच ठिकाणी दोष नाही.
हे जगत् सत् आहे. म्हणूनच त्याला सुकृत म्हटले आहे. जगत पुण्य आहे, लोक म्हणतात, 'जगत हे पाप आहे, आम्हाला मायेच्या चिखलात फेकून दिले आहे.' फेकून कशाला देईल तो? तुम्ही तुमच्या मुलाला फेकून देता? नाही ना! तसाच भगवंत देखील फेकून देत नाही आणि कदाचित फेकले तर स्वतः देखील उडी घेईल याची खात्री बाळगा.
मुलाच्या पुस्तकात एक गोष्ट असते. त्यात सर्वांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. एकाला आंबा फार आवडत असे. त्याने मोठा कोहळा पाहिला आणि त्याला वाटले आंबा एवढा मोठा असता तर? दुसऱ्या दिवशी तो एका आंब्याच्या झाडाखाली बसला होता, सावली होती आणि अचानक वरून त्याच्या डोक्यावर एक आंबा पडला त्याला वाटले जर आंबा कोहळ्या एवढा मोठा असता तर माझे काय झाले असते? म्हणजे छोटे फळच योग्य आहे अशा प्रकारे सर्व जगत् दोष रहित आहे. या सृष्टीत दोष नाहीच.
माणसाच्या या शरीरात देखील दोष नाही. शरीरात फेरफार करण्याचे काही कारण नाही. खरोखर हे आश्चर्य आहे की भगवंताने एकवेळच सर्वांचा साच्या घडवला, अंतिम रेषा काढली ती फायनल झाली पूर्ण गोष्ट. मग त्यात फेरफार नाही. रावणाच्या काळी ज्या ठिकाणी हृदय होतं आज देखील ते तिथेच आहे आणि दोन हजार वर्षानंतरही तिथेच असणार आहे. हृदयाची जागा बदलण्याची गरज नाही. भगवंताने एकदा जगत बनवले त्यात फेरफार नाही. ते दोषरहित आहे. म्हणूनच सुकृत आहे.
मानवाने स्वतःपासून सुरुवात करून सर्व जगाकडे बघितले तर त्याला दिसेल की विश्व सुकृत आहे. म्हणजे चांगल्या रीतीने बनवले आहे. चंद्र, सूर्य सर्वात चांगल्या प्रकारे फारच सुंदर बनवले आहेत. भगवंताची करुणा अद्भुत आहे. भगवंताने लहान लहान गोष्टी देखील सूक्ष्मपणे पाहिल्या आहेत. मुले जर लवकर उठली तर त्यांचे आयुष्य वाढेल असे भगवंताला वाटले. लवकर उठाल, ताबडतोब स्नान कराल तर स्फूर्ती राहील, चित्त एकाग्र होईल आणि वृत्ती चांगली राहील. पण ताबडतोब शुचिर्भूत व्हायचे असेल तर पाणी तुम्हाला थंड वाटेल, परंतु सूर्योदयाच्या आधी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाल तर पाणी उबदार असते. जस जसा सूर्य वर येतो, तसतसे पाणी थंड होत जाते. पाण्यामध्ये शीतलता आहे तशी बाहेर उष्णता ठेवली आहे. अशा प्रकारे जगत दोषरहीत आहे.
एखाद्या वेळी आपला पाय घसरतो किंवा आपण पडतो आणि आपल्याला असे वाटते की हा सृष्टीमध्ये दोष आहे. पण वास्तविक पाहता सृष्टीत काहीही दोष नाही.
Comments
Post a Comment