मला माझी कर्मभूमीच प्राप्त होवो.


 
      
   ' जीव बध्द आहे' अस जीव स्वतः समजतो. ही त्याची समजूत हीच माया आहे. जीव शिव होऊन मुक्त होतो हे सांगण्याची  काही आवश्यकता नाहीच. हा सिद्धांत आहे, हे तत्त्वज्ञान आहे. मात्र जीव, जीव राहूनही मुक्त होऊ शकतो हे सांगण्यासाठी समजावण्यासाठी संतांची गरज आहे.
     
जीव शिव झाल्यानंतर मुक्त होतो यात काहीच विशेष नाही, ते स्वाभाविक आहे. पण, जीव शरीरात राहूनही मुक्त आहे, हे विशेष आहे.
      
जसा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत  अनंत वृत्ती निर्माण करून रात्री सर्व वृत्ती फेकून देतो. त्यातल्या एकीचे स्मरण मला झोपेत राहत नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने देखील अभेदाचे अस्तित्व मान्य करूनही भेदाच्या अनंत स्वरूपात क्रीडांगण उभे केले. म्हणून सोऽकामयत्|
      
भगवंताने बहु स्याम् प्रजायेय अशी इच्छा केली, परंतु ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तप केले. त्वरित सिद्धी मिळाली तर त्या सिद्धीला अर्थही नाही आणि आनंदही नाही. म्हणून भगवंताला अनेक व्हायचे असेल, सृष्टीमध्ये व्यापक होऊन राहायचे असेल तर त्याला तप करावे लागले. नाही तर भगवंताला तप करण्याची गरज काय? पण त्याने तप करायचे एक नाटकच केले.
     
तप केले म्हणजे त्यांनी एक विशिष्ट विचार केला आणि तो तपातून दृढ केला. तप केले म्हणजे प्लॅन तयार केला. ज्याप्रमाणे घर बांधायचे असले तर आर्किटेक आधी प्लॅन तयार करतो. त्याप्रमाणे भगवंताने तप केले.
     
तपाद्वारे भगवंताने जगाला समजावले की तुम्हाला काही पाहिजे असेल तर तप करावेच लागेल. तप करून जे प्राप्त कराल त्यात गोडवा असेल‌. काहींना वाटते की इच्छा करताच सगळे मिळाले तर जगात सर्व माणसे सुखी होतील. परंतु वास्तव तसे नाही. कल्पवृक्षाखाली बसून माणसाने इच्छा केली तर ताबडतोब त्याला हवे ते मिळते. मात्र श्रीखंड खाण्याची इच्छा केली आणि ते तत्काळ हजर झाले तर त्यात आनंद कसला? प्रत्येक वस्तू अशी इच्छा करताच मिळत असेल तर पुरुषार्थाला अवकाशच उरणार नाही. जसा शिक्षेसाठी नरक आहे तशाच प्रकारे सजा म्हणून भगवंत स्वर्गात देखील पाठवत असेल. काही केल्याशिवाय सर्व काही मिळत असेल तर ते देखील एक प्रकारची सजाच आहे.
     
म्हणून तर म्हटले आहे की प्राप्ते माम् कर्मभूमौ - मला माझी कर्मभूमीच प्राप्त होवो. त्यासाठी मृत्यूलोकच चांगला. तेथे कर्म केल्याचे समाधान आहे, आनंद आहे.
    
जीवणाचे खरे रहस्य हे आहे की इच्छा केल्यावर ताबडतोब मिळता कामा नये. जर इच्छा करताच वस्तू मिळाली तर त्यातील आनंद नाहीसाच होतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन