'ब्रह्माचे बहुभुवन'
श्रुतीने सांगितले आहे त्या प्रकारची जाणीव दृढ झाली तर माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल.
भगवंताने, अवघी सृष्टी निर्माण करूया अशी कामना केली नाही, तर बहु स्यां प्रजायेयेति - मी अनेक बनीन अशी कामना केली आहे.
इथे प्रजायेय या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. एखादा चित्रकार इच्छा करतो की मी पुष्कळ चित्रे काढीन अथवा एखादा कुंभार इच्छा करतो की मी पुष्कळ मडकी बनवीन, असे हे नाही. चित्रकार चित्र काढतो आणि त्या चित्रापासून निराळा होतो. कुंभार मडके घडवून मडक्यापासून निराळा होतो. तो काही मडक्यांमध्ये शिरून त्यात वास करत नाही. मडके पुरे झाले की मडक्या सोबतचा त्याचा संबंध संपला. भगवंताचा सृष्टीशी अशा प्रकारचा संबंध नाही. तो तर सृष्टी निर्माण करून त्यातच वास करून आहे. त्याने 'मी सृष्टी निर्माण करतो' अशी इच्छा न करता 'मी स्वतःच अनेक होईल' अशी इच्छा निर्माण केली आहे. म्हणून बहु स्यां प्रजायेये- असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे ब्रह्माचे व्यापक होणे यालाच 'ब्रह्माचे बहुभुवन' म्हणतात, जे त्याचे स्वतःचेच पुष्कळ होणे होय.
आता प्रश्न हा येतो की त्याने अशी इच्छा कशासाठी केली? सर्वेश्वर भगवंताला कोणी विचारणार की बाबा! तू अशी का बरे केलीस? कुणी विचारले तर कदाचित त्याचे उत्तर मिळेल देखील, पण विचारायला जाईल कोण? आणि कुठे?
माणसाचा एखादा छोटेखाणी बंगला असतो. त्या बंगल्यात तो खालून वर जातो. त्याला कोण विचारणार की तू वर का गेलास? मनाला वाटले म्हणून गेला तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत कशासाठी गेला! यासाठी काही खास कारण असेल असेही नाही. प्रत्येक गोष्टीचे काही कारण असलेच पाहिजे असे नाही.
'घर माझे आहे, मला योग्य वाटेल ते मी करीन. तुम्ही कोण मला विचारणारे? असे जर माझ्या सारख्या सामान्य माणसाला वाटते तर हा तर परब्रम्ह, परमात्मा आहे. सर्वेश्वर भगवंताने कशासाठी इच्छा केली असा प्रश्न उभाच राहत नाही. जर त्याला प्रत्येक गोष्टीचे कारणच विचारायचे असेल तर त्याचे सर्वेश्वर पणच कुठे राहिले?
आणि तरीही प्रश्न विचारायचाच असेल तर त्यामागे काव्यात्मक जाणीव देखील असू शकते. त्याचे उत्तर काहीसे असे असू शकते की ती चित् शक्ती अनंतरूप आहे तोपर्यंत अस्तित्व राहणार, आनंदरूपता राहणार, त्यात अभेद राहणार. पण खेळायचे असेल तर तिथे भेद निर्माण होणार. हा व्यवहार आहे.
पती-पत्नी खेळायला बसले म्हणजे भेद येणारच. पत्नीकडे एक्का असला तरी हुकमाच्या तिरीने पती त्याला मारणारच. 'आपण दोघे एकच आहोत, हा एक्का तर आपलाच आहे मग त्याला कशाला मारा?' असा विचार त्यावेळी संभवू शकतच नाही. ही एक विचित्र घटना वाटते. पण भेद असला तरच खेळ होतो आणि तरच त्याचा आनंद अनुभवता येतो.
Comments
Post a Comment