'जीवन हे काव्य आहे'

       
जिवंत असताना आपण काय केले ते प्रत्येकाला माहीत असतेच, पण मरणोत्तर काय स्थिती प्राप्त होणार आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे‌. विद्वान, अविद्वान दोघांमधूनही चैतन्य कधी न कधीतरी निघून जातेच ही वस्तुस्थिती आहे. पण नंतर ते व्यापक चैतन्यामध्येच मिसळून जातात की मग दोहोमध्ये काही अंतर आहे काय?
     
मरण ही एक अशी समस्या आहे की तिच्याविषयी विचार केल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. गीतेने सांगितले आहे की मरण म्हणजे कपडे बदलणे. आपण म्हणूया की मरण म्हणजे माहेरी जाणे. तर कोणी म्हणेल की मरण म्हणजे आईला भेटायला जाणे‌. पण अशी एवढी साधी सरळ हृदयांगम गोष्ट आहे का? मरणात आकर्षकता असेल तरी ती भयानक आकर्षकता आहे. सामान्यतः असा कोणी माणूस नाही की त्याला मरण हवे आहे!
      
हा! असे शक्य आहे की दारिद्र्यापायी कंटाळून माणूस असे बोलतोही की,  'यापेक्षा मरण बरे!' पण तो भाव क्षणिकच असतो. शूद्रकाने 'मृच्छकटिक' नाटक लिहिले आहे. त्यात एकदा चारुदत्ताला त्याचा मित्र विचारतो की, 'दारिद्र्य आणि मरण या दोहोतून तू काय पसंत करशील?' तेव्हा तो म्हणतो, दारिद्र्यात मरणं वरम् अर्थात दारिद्र्यापेक्षा मरण चांगले. मरणाचे वर्णन करणे हा कवी लोकांचा संकेत आहे पण तशी वस्तुस्थिती नाही. मरण चांगले आहे असे जर चारुदत्ताला वाटत होते तर रात्री वसंत सेनेला पोहोचवायला गेलेला चारुदत्त घरी परत कशासाठी आला? क्षिप्रा नदीत उडी मारून त्याने मृत्यू का नाही स्वीकारला?
     
काही जण घरच्या कलाहाला कंटाळून मारण्याची इच्छा प्रदर्शित करतात पण वस्तुतः त्यांना मरायचे नसते.
      
एका संस्कृत पंडिताने काव्यात वर्णन केले आहे की जोपर्यंत जीवन जगण्या सारखे आहे तोपर्यंतच मरण्याचा आनंद आहे, हा देखील एक कवी संकेतच आहे. वास्तविकता तर याहून वेगळीच आहे. माणसाला जीवनात आनंद वाटत असेल तर मरणाची कल्पना करायची कशासाठी? त्याला मरण कधी चांगले वाटेल?
     
इंदूमातीच्या मृत्यूनंतर अज राजा खूप व्यथीत होऊन रडू लागला तेव्हा त्याला तत्त्वज्ञान समजावण्यासाठी कालिदासाने वशिष्ठांच्या तोंडून सांगितले आहे की, मरण हे प्रकृती आहे आणि जीवन विकृती आहे असे विद्वान लोक मानतात. शरीराची नऊच्या नऊ दारे खुले आहेत असे असूनही जीव त्यातून उडून जात नाही ही एक विकृती आहे. कवीची ही कल्पना सुरम्य आहे पण ही कालिदास किंवा कोणाच्या जीवनाची अनुभूती नाही.
      
लहानपणी कालिदासाच्या पुढ्यात मृत्यू येऊन उभा ठाकला असेल तेव्हा त्याला तो भयानक राक्षसासारखा वाटला असेल आणि त्याने मृत्यूला म्हटले असेल की, 'अरे तू आत्ताच माझ्याकडे आलास? मला तर अजून खूप काही करायचं आहे.' तारुण्यात त्यांच्यापाशी मृत्यू आला असेल तेव्हा कालिदासांनी निश्चितच म्हटले असेल की, 'आत्ताच तर माझ्या जीवनाचा वसंत फुलला आहे. जीवन वृक्षाला मोहर फुललेल्या आहे. अशावेळी तू मला न्यायला आलास? अजून तर पहिल्या प्रीतीची नशा उतरली ही नाही. जीवन म्हणजे फुलांच्या पायघड्यावरून चालण्यासारखे वाटते आहे आणि तुला अशावेळी मला घेऊन जाण्याचे सुचते आहे? तुला मला न्यायचेच असेल तर यौवन भोगवून घेऊ दे, मग मला ने.' प्रौढ वयाचा झाल्यावर हळूच कालिदासाच्या खांद्यावर हात ठेवीत मृत्यूने म्हटले असेल, 'बाळ, चल आता.' तेव्हा कालिदासाने म्हटले असेल की, अरे मेघदूत आणि शाकुंतल मी एवढ्यातच पूर्ण केले त्यात मी यौवनातील प्रेम चितारले आहे. प्रौढावस्थेतील प्रेमचितारण्याचे अजून राहून गेले आहे‌. तर तू एवढ्यातच मला न्यायला कसा आलास? चित्रगुप्ताच्या हिशोबात काहीतरी चूक झालेली दिसते आहे.'
   
 ' जीवन ही विकृती आणि मरण ही प्रकृती आहे' असे त्याने काव्यात भले लिहिले असो परंतु 'जीवन हे काव्य आहे' असेच कालिदासाला वाटले असेल.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन