सृष्टी सुंदर आहे हे सांगण्यासाठीच माणसाचा जन्म आहे.

सृष्टी सुंदर आहे हे सांगण्यासाठीच माणसाचा जन्म आहे.
       
आत्मशक्ती आनंदमय आहे. समग्र विश्व आनंदमय आहे सुंदर आहे, सुंदर आहे, अति सुरेख आहे. अरे, भल्या भल्या लोकांना या जगतात जन्म घेण्याची इच्छा होते. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा मला तू गर्भवास दे, त्यात सुखच आहे. मला या जगतात जन्म घ्यायचा आहे हेच या जगताचे, त्याच्या सौंदर्याचे वैशिष्ट्य आहे.
      
आपण भगवंतापाशी जन्म मागितलेला असो वा नसो आपल्याला दुसरा जन्म मिळणारच आहे. एवढेच की पुढील जन्म माणसाचा मिळाला तर ती मात्र मोठी गोष्ट आहे.
      
या जगाकडे नजर टाकली तर सर्वत्र आनंदमयता दिसेल. निसर्गाकडे दृष्टी टाकली तर झरे, नद्या, वृक्ष, पहाड सर्व ठिकाणी आनंदच आनंद दिसेल. पक्ष्यांच्या किलबिलाटातही आनंदच आहे! समग्र विश्व आनंदाने भरलेले आहे. एवढेच नव्हे तर अध्यात्मात आणि विकारातही आनंद सारखाच आहे. यात काहीच फरक नाही आणि तरीही माणूस दुःखाने रडत बसला आहे.
      
भगवंताने ही सृष्टी अशा प्रकारे सुंदर, आनंदमय अशी निर्माण केली आहे की भगवंतालाही या सृष्टीत येऊन राहण्याची इच्छा होते. त्याला या सृष्टीचे सौंदर्य पाहायचे होते, अनुभवायचे होते म्हणून त्याने मला डोळे दिले. मी डोळे मागितले होते काय? समजा कोणी एखादा स्वादिष्ट पदार्थ बनवला आहे आणि तो पदार्थ रुचकर, स्वादिष्ट बनलाही आहे पण त्याचा आस्वाद घ्यायला, कोणी नसेल तर? अशा रीतीने भगवंताने ही सुंदर सृष्टी बनवली खरी पण ते सौंदर्य अनुभवायला कोणीच नसेल तर? ही सृष्टी सुंदर आहे, असे सांगणारे कोणीच नसेल तर या सौंदर्याचा, या रमणीयतेचा काही अर्थ राहिला तरी काय? म्हणून ही सृष्टी सुंदर आहे, चांगली आहे, रमणीय आहे हे सांगण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. त्याला दुसरे काहीच सांगायचे नाही.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.