प्राण म्हणजे कोण?

 प्राण म्हणजे कोण?
    
ज्याप्रमाणे यापूर्वी अन्नमय कोषाचे शरीर मानले होते त्याचप्रमाणे प्राणाचा पण शरीर आत्मा मानला आहे. म्हणून प्राणमय शरीर म्हटले आहे. अन्नमयकोषाला ब्रह्म समजा असे म्हटलेय, कारण की अन्नामुळे तर जीवन चालते. अन्नामुळेच रक्त बनते. त्याच्यामुळेच माणूस मोठा होतो. खाल्ले नाही तर वजन कमी होईल. अशा प्रकारे, समग्र शरीर अन्नामुळेच बनलेले असल्याकारणाने त्याला ब्रह्म समजून उपासना केली पाहिजे.
      
श्रुती समजावते की शरीर हे काही जीवनाचे सर्वस्व नाही. त्याच्या आत प्राणवायू फिरत राहिला आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणून त्याला ब्रह्म समजून उपासना करायला सांगितले आहे.
      
प्राण म्हणजे कोण? आपल्या आतील प्राणवायू. पण प्राणवायू जड आहे. तर मग गावठी भाषेत सांगायचे तर प्राण म्हणजे 'मी'. तर मग काय मी माझीच उपासना करायची? नाही, असे नाही. श्रुतीचे सांगणे आहे की आतली जी प्राणशक्ती आहे. ती विकसित करायची आहे.
     
माणसे क्रियाशील आहेत, ज्ञानशील आहेत, जे ज्ञानबुद्धीत उतरले ते क्रियेमध्ये आणण्याची त्यांची हिमंत आहे. भगवंताने माणसाला तशी शक्ती दिली आहे. म्हणूनच माणसाने त्याप्रमाणे केले नाही तर भगवंत त्याला फटका सुद्धा मारतो. पशुपाशी तशी शक्ती नाही म्हणून त्याला तो सांभाळतो. माणसाला ज्ञान शक्ती तसेच क्रियाशक्ती दिली आहे. म्हणून स्तुतीची अपेक्षा आहे की माणसाने प्राणाला ब्रह्म समजून स्वतःचे जीवन जगले पाहिजे. तसे तर पशु आणि आपण सर्वच प्राणाला सांभाळतो. परंतु श्रुतीच्या सांगण्यानुसार त्याला केवळ सांभाळायचेच नाही तर त्याची उपासना करायची आहे, त्याला ब्रह्म समजून विकसित करायचा आहे. एवढेच नाही तर त्याला ब्रह्मच मानले पाहिजे. अर्थात त्याला ब्रह्मासारखे बनवायचा आहे, ब्रह्मामध्ये मिसळून टाकायचे आहे.
    
आतील प्राणाला ब्रह्म समजायचे असेल तर स्वतःला हलके ठरवून कसे चालेल? श्रुती आग्रहपूर्वक सांगते की प्राणाला ब्रह्म समजून त्याची उपासना कर. परंतु प्राणाला ब्रह्म समजण्याची गोष्ट तर दूरच राहो, त्याला माणूस समजण्याची तरी आपली तयारी आहे का?
   

Comments