निरूपयोगी कोण ?

  निरूपयोगी कोण ?
   
पशु मरतो तेव्हा त्याच्या चामड्याचा जोडा तरी बनतो, पण माणूस मरतो तेव्हा त्याचे काही बनते? माणूस हा या सृष्टीतला निरोपयोगी प्राणी आहे. परंतु या शरीराचा फार मोठा उपयोग आहे असे समजावून संत सांगतात की नर अपनी करनी करे तो नरका नारायण हो जाये - माणूस स्वतःचे कर्तव्य कर्म करेल तर तो नारायण होऊ शकतो. नराचा नारायण होणे याचेच नाव जीवन. त्याने केवळ रूप बदलायचे नारायण नर कसा झाला ते आपल्याला माहित नाही, पण नराचा नारायण व्हायचा असेल तर मेहनत करावी लागतेच. परंतु तो नर राहील तर ना? नर असेल तर नारायण होईल ना?
     
दुनियेतील सर्व पदार्थांमधील निरोपयोगी पदार्थ कोणता ते शोधून काढले पाहिजे. एका संन्याशापाशी एक युवक आला आणि त्याने तत्त्वज्ञान समजावण्याची विनंती केली. पण तत्त्वज्ञान हे काही असे गाठोडे नाही की पटकन सोडून समजावे. त्यासाठी दृष्टी जोपासावी लागते. परंतु युवक उत्साही होता. जिज्ञासू वृत्तीने आला होता. त्यामुळे संन्याशाने म्हटले की, 'तू जगात जा आणि एक निरुपयोगी पदार्थ घेऊन ये.'
     
युवकाला वाटले की यात काय मोठीशी कठीण गोष्ट आहे. एक निरोपयोगी पदार्थ आणण्यासाठी तो बाहेर पडला. त्याने वाटेतला एक दगड उचलला. तेव्हा दगडाने म्हटले, 'तू काय मला निरोपयोगी समजतोस? हे महाल, मंदिरे इत्यादीमध्ये तर माझाच उपयोग होतो. ही सुंदर मूर्तीची तू पूजा करतोस ती माझ्यातूनच बनली आहे ना? त्यासाठी मी टाकीचे किती घाव खाल्ले आहेत? असे असूनही तू मला निरोपयोगी समजतोस? त्याला वाटले की दगड तर फार उपयोगी आहे. त्याने दगड फेकून दिला. पुढे जाता जाता त्याने लाकडाचा एक तुकडा पडलेला पाहिला. त्याला तो निरोपयोगी वाटला. पण लाकडाने म्हटले, :ज्या खाट्यावर तू झोपतोस ती खाट, लहानपणी ज्या पाळण्यात तू झोपायचास तो पाळणा सुद्धा माझ्यातूनच बनला आहे. रंदा मारल्याने मी किती झिजलो आहे त्याची तुला कल्पना आहे? अरे, तुझा स्वयंपाक ज्या चुलीवर होतो त्यात तर मीच स्वतःची आहुती देतो. आणि तो निकामी समजून मला उचललेस? तेव्हा त्याने लाकडाचा तुकडा सुद्धा फेकून दिला. पुढे जाऊन त्याने विष्ठा पाहिली. त्याला खात्री वाटली की ही तद्दन निरुपयोगी वस्तू आहे. पण तिला उचलायला जाताच विष्ठेने म्हटले, 'तू मला निरोपयोगी समजतोस? तुला माहित आहे की मी जीवन देते त्यातून खत बनते आणि ते वापरून शेतकरी धान्य पिकवतो आणि ते धान्य तू खातोस. पण तुझ्या पोटात ते पडले, तुझा एका रात्रीचा संग झाला आणि माझ्या मध्ये ही दुर्गंधी आली. तू बासुंदी खाल्लीस, किती छान होती. तिला किती सुंदर सुवास होता! पण तुझ्या पोटात जाताच एका रात्रीच्या संगाने त्यात दुर्गंध आला. माझ्यात जो दुर्गंध आहे तो तुझ्यामुळे आहे. दोष तुझा आहे आणि तू मला निरोपयोगी समजतोस?'
      
युवक थकून परत फिरला. संन्याशाने विचारले, 'निरोपयोगी पदार्थ आणलास? युवक म्हणाला, महाराज! निरपयोगी पदार्थ तर मीच आहे.'
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन