पंचप्राणांची व्यवस्था


 पंचप्राणांची व्यवस्था

 या प्राणमय आत्म्याचा प्राण माथा आहे. व्यान उजवा पक्ष आहे, अपान डावा पक्ष आहे म्हणजे प्राण, अपान , व्यान, उदान आणि समान अशी पंचप्राणांची व्यवस्था केली आहे. एकच माणूस पाच ठिकाणी काम करत असतो तेव्हा तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातोच ना! घरात माणसाला सर्वजण दादा म्हणून हाक मारतात, पण ऑफिसमध्ये तो सेक्रेटरी साहेब म्हणून ओळखला जातो. क्लब मध्ये सगळे त्याला प्रेसिडेंट म्हणून संबोधतात. वेगवेगळ्या कामानुसार जशी माणसाला वेगवेगळी नावे असतात त्याप्रमाणे एकच प्राणवायू आहे पण तो वेगवेगळी कामे करत असल्याने तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
      
प्राणवायू हृदयात असतो, अपानवायू मलमूत्रविसर्जनाचे काम करतो. अपानवायू बिघडला तर मल मूत्रविसर्जनाचे काम योग्यरीत्या होत नाही. आपली संपूर्ण आयुर्वेदाची पद्धती ही त्रिदोष पद्धती आहे आणि ती कफ, पित्त आणि वात यावर आधारित आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी मध्ये केवळ औषधांचा फरक नाही तर त्यांच्या मूलभूत चिकित्सा पद्धतीतच फरक आहे. शरीरात कफ, पित्त आणि वात हे तीनही असले पाहिजेत आणि ते सम राहिले पाहिजेत. त्यांना सामान ठेवण्याचे काम नाभी मंडळात राहून समान वायू करत असतो.
       
कंठात उदान वायू आहे, जो आपल्याला बोलताना, उच्चार करताना उपयोगी आहे. आणि व्यान वायू संपूर्ण शरीरात फिरून रक्त चक्राकार पोहोचवण्याचे काम करतो. म्हणून या पाच वायूंना पंचप्राण म्हणतात. जुन्याकाळी लोक या पंचप्राणांना आहूती देऊन जेवत असत. जेवताना ॐ प्राणाय स्वाहा| ॐ अपानाय स्वाहा|ॐ उदानाय स्वाहा| ॐ समानाय स्वाहा| ॐ ब्राम्हणे स्वाहा| असे बोलून आहूती देऊन आपोष्णी घेत असत आणि नंतर जेवायला सुरुवात करत असत. ताटात वाढले की पटकन मुखात घास घातला अशी पद्धत सभ्य मानली जात नव्हती.
     
प्राणवायूचे वर्णन श्रुती रूपकात्मक रीतीने करते. आतील वायू जणू शरीर आहे. जो प्राण आहे. त्याला पुरुषाकार म्हणून सांगतात की प्राण त्याचे शरीर आहे. व्यान वायू त्याचा उजवा पक्ष आहे. आणि अपान दक्षिण पक्ष आहे. आकाश आत्मा - आकाश त्याचा आत्मा आहे. आणि पृथ्वी पुच्छं प्रतिष्ठा| प्रतिष्ठा म्हणजे आधार, आश्रय देणारी, धारण करणारी आहे. संपूर्ण प्राणमय वायू ही पृथ्वी धारण करते.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन