कोजागिरी पौर्णिमा
'अश्विने शुक्लपक्षे तु भव्येद्या चैव पौर्णिमा| तद्रात्रौ पूजनन कुर्याच्र्छियो जागृतिपूर्वकम्||
निशिथे वरदा लक्ष्मी: को जागृति भाषिणी| जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी| तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले||
आश्विन शुद्ध पौर्णिमेला रात्री लक्ष्मीपूजन करायचे व जागरण करायचे. त्या दिवशी मध्यरात्री वर देणारी लक्ष्मी 'कोण जागत आहे?' असे म्हणते आणि 'जो जागत असेल त्याला धन देईन' असा विचार करून मनुष्याचे प्रयत्न पहात पहात पृथ्वीवर फिरते.
लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुण लक्ष्मी, सौंदर्य लक्षमी, भाव लक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसांना मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही वाढवू शकत नाही.
ह्या दिवसा निमित्त कोजागिरी व्रताची कथा प्रसिद्ध आहे. वलीत नावाचा मगध देशाचा एक विद्वान ब्राह्मण स्वतःच्या अयाचक व्रतामुळे निर्धनतेचा भोग बनला होता. त्याच्या निर्धनतेला कंटाळलेली त्याची पत्नी त्याची एकही गोष्ट मानीत नव्हती. एवढेच नाही तर पती जे सांगेल त्याच्या अगदी उलट वागत होती. गणपती नावाच्या त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला की, तुला पत्नीकडून जे करून घ्यायची इच्छा असेल, त्याच्या उलटच तो तिला सांग. विपरीत आचरणाव्रत घेतलेली तुझी पत्नी तू सांगशील त्याच्या उलट करेल आणि जे तुझ्या मनाला वाटते तसे होईल. गणपतीच्या सल्ल्यानुसार वलितने उलटे उलटे बोलून स्वतःच्या पत्नीकडून आपल्या वडिलांचे श्राद्ध करायचे करून घेतले आणि तसे ते केले. पण शेवटी आनंदात येऊन पिंड विसर्जन करण्याच्या क्रियेच्या वेळी तो उलटे बोलायला विसरला. तो म्हणाला, 'पिंड गंगेत सोडायचे.' त्याच्या पत्नीने सांगितले, 'पिंड गटारात टाकायचे.' त्याच्या पत्नीने पिंड गटारात टाकले क्षणिक चुकेने कार्य बिघडवून टाकले. जीवणातही क्षणिक प्रमादात कित्येक वेळा मानव अधःपतनाचे कारण बनतो.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्लासाचा उत्सव! त्या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळा ही कलाने फुललेला असतो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवशीचा चंद्र सर्वात मोठा मोठा वाटतो. चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघाने झाकलेले असते त्यामुळे चंद्र दर्शन स्पष्ट होत नसते. त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो.
चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो, केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहक बनते. परंतु त्यात जेव्हा अंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शितल व शांतीदायक बनते. संताजवळ चंद्राच्या शितल चांदण्या प्रमाणे सारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळच्या अवतार रामकृष्ण. यांच्या जवळी शांत प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने रामचंद्र म्हणू लागले.
गीतेत भगवंताने 'नक्षत्राणाहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानले आहे. सूर्याच्या त्याच्याकडे पाहणं कठीण आहे पण चंद्रासमोर तर तासंतास मांडी घालून बसून बघू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांतीचा काही अंशी अनुभव येईल.
चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारक आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधी गुणांना पुष्ट करण्यासाठी चंद्राचा फारच मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात की, 'रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमा भूत्वा रसात्मक:|'
त्यादिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. ह्या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास गरबा खेळायचा पण ह्या सर्व आनंदात उज्वलता राखायचे. विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने जो उत्सवाचा उल्हास किंवा जेवणाचा आनंद मिळू शकतो तो पूर्णतः प्राप्त करू शकतो. असा संदेश आपणास सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो. आपण त्याचा तो संदेश पाळला तर किती चांगले होईल!
Comments
Post a Comment