शितला सप्तमी
शितला सप्तमी
श्रावण महिन्याच्या शुद्ध सप्तमींला शीतला सप्तमी म्हणतात. तिच्या अगोदरच्या षष्ठीला स्वयंपाक षष्ठी म्हणतात. स्वयंपाक षष्ठीच्या दिवशी सर्व शिजवून घेतल्यावर स्रीया शेगडी आदी सर्व भोजन बनवण्याच्या साधनांची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी शिळे, थंड जेवण जेवतात.
हा उत्सव साधन पूजेचा महिमा समजावतो. ज्या साधनाद्वारे आपण आपली कार्य करतो ती साधने जड असूनही आपल्या उपयोगी पडतात. म्हणून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ बुद्धी ठेवली पाहिजे. तात्विक दृष्टीने पाहता जगात काही जड नाहीच. आणि म्हणून आपल्या कामात सहाय्य बनणाऱ्या निमित्तरूप साधनात असलेल्या सुप्त चैतन्याची आपण पूजा केली पाहिजे.
शितला सप्तमीच्या दिवशी स्त्रिया शेगडीची पूजा करतात. चूल ही स्वयंपाक घरातील देवता आहे. कृतज्ञतेच्या पायावर उभी असलेली भारतीय संस्कृती या ग्रहदेवतेचे उपकार कसे विसरेल? स्वतः तापून जे रोज आहार शिजून देते त्यात चुलीचे पूजन करून स्रीया चुली बद्दलची स्वतःची कृतज्ञता प्रदर्शित करतात. एवढेच नाही तर सतत तापलेले राहणाऱ्या ह्या चुलीत त्या दिवशी आंब्याचे लहान रोपही ठेवण्यात येते. याच्या पाठीमागे आम्रवृक्षाची शीतलता तिला सतत मिळत राहावे व आंब्याच्या फळासारखा गोडवा तिने भोजनात भरावा अशी भावना आलेली आहे.
भारतीय संस्कृती कार्य साधनात किंवा कार्यसिद्ध झाल्यानंतर साधनांची उपेक्षा करीत नाही. तसे ती मानत नाही. एवढेच नाही तर जी साधने कार्य साधक बनली किंवा बनू शकतात त्यांच्याबद्दल नेहमी गौरव बाळगायला सुचवते. स्री शेगडी किंवा जात्याची पूजा करते. शेतकरी स्वतःच्या नांगराची पूजा करतो. व्यापारी तराजू पवित्र मानतो तसे पंडित स्वतःच्या पुस्तकांचे पूजन करतो. प्रत्यक्ष सेवेच्या साधनांना पवित्र मानून ज्या भारतीय संस्कृतीने त्याचे पूजन केलेले आहे ती भारतीय संस्कृती 'प्रत्येक सेवा कर्माला पवित्र मानते' असा उद्देश करते तो यथार्थच आहे.
Comments
Post a Comment