अतिथी - ज्याच्या जीवनात श्रेष्ठत्व आहे तो अतिथी

 अतिथी
   
अतिथी म्हणजे जो दुसऱ्या दिवशी राहत नाही; दुसरी तिथी पाहत नाही. याचा अर्थ जो आजच्या पुरताच आला आहे तो अतिथी, त्याला देव समज. पण याचा अर्थ असा नव्हे की जो भीक मागायला आला असेल किंवा पैसे मागायला आला असेल त्याला देव समजून त्याची पूजा कर.
        
जगात जन्म घेऊन ज्याने काही विशेष केले आहे, अर्थात ज्याच्या जीवनात श्रेष्ठत्व आहे त्याला अतिथी म्हणतात. आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्याकरता लांब केलेले पाय खेचून घेतो किंवा बसलेले असू तर उभे राहतो, अशी जी व्यक्ती असेल तिला अतिथी माना. तिला देव समजा. आपल्याकडे येणारे सर्व लोक स्वर्थीपोटीच येतात असे देखील नाही. कित्येक लोक रिकामटेकडे असतात ते स्वार्थापोटी भले येत नसतील पण गप्पा मारायला येतात त्यांना अतिथी मानले जात नाही.
        
पण जगात असेही कित्येक अतिथी आहेत की जे आल्यानंतर जगत् श्रेष्ठ झाले. त्या सर्वांना नमस्कार केला पाहिजे. वशिष्ठ, विश्वमित्र, याज्ञवल्क्य, पतंजली, वाल्मिकी या सगळ्यांना जगाकडून काय घ्यायचे होते? त्यांचे समग्र जिवन तपासले तर कळेल की त्यांना स्वतःचा काही एक स्वार्थ नव्हता, ते लोक काही भोगण्यासाठी आले होते? असे देखील नव्हते. तर मग ते कर्मे भोगण्यासाठी आले होते तसे देखील नव्हते, कारण ते लोक भगवंताशी जोडले गेलेले असल्याने भगवान ठेवेल तसे राहत होते. तर ते लोकांसाठी आले होते! तसे देखील नव्हते, कारण लोकांना त्यांची गरज नव्हती.
       
एखाद्या उद्योगपतीची जेवढी गरज आहे तेवढी पतंजलीची कोणाला नाही. शक्य आहे की जीवनात हताश झाल्यावर एखाद्या वेळी माणूस पतंजलीची सूत्रे वाचत असेल. परंतु तो अगतिकतेमधून 'पतंजली' वाचतो. वास्तविक पतंजलीची कुठे कोणाला गरज आहे? देव घ्या कोणी देव घ्या असे घसा फोडून सांगत तुकाराम महाराज सर्वत्र फिरत होते पण हराम कुणी तुकाराम महाराजांचे ऐकत असेल!
       
जगात आल्यावर ज्यांना पुण्य कमवायचे नाही, ज्यांना कोणती जिजीविषा नाही आणि ज्यांना मुमुर्षा देखील नाही, ज्यांनी कधीही भगवंताकडे स्वतःची इच्छा देखील प्रगट केली नसेल त्या लोकांचे जगात येण्याचे कारणच कळत नाही. त्या कक्षेतल्या लोकांना अतिथी म्हणायचे.
 
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन