अस्थिर विचारांची माणसे आणि त्यांचे अस्थिर जीवन.
अस्थिर विचारांची माणसे
भगवंताजवळ बसण्याची सुरुवात करायची असेल तर माणसाने प्रथम स्थिर बसले पाहिजे, शरीराची हालचाल बंद राहिली पाहिजे. जसे शरीराचे स्थैर्य हवे तसे विचारांच्या आणि उपास्यांचे स्थैर्य देखील हवे. या तिन्ही गोष्टीत माणुस स्थिर असला पाहिजे.
यौगिक प्रक्रियेत माणसाने शरीर, मान व माथें समांतर ठेवावे ही शारीरिक प्रक्रिया आहे. शारीरिक स्थैर्यासोबत विचारांचे स्थैर्य असणे आवश्यक आहे. अस्थिर आणि चंचल विचारांचा माणूस चित्त एकाग्रतेत पुढे जाणार नाही. त्याला क्षणात एखादी वस्तू आवडीनाशी होते तर क्षणात ती चांगली वाटते. वस्तू चांगली किंवा वाईट वाटण्यामागे त्यांच्याकडे काही खास कारणही नसते. अशा अस्थिर विचारांची माणसे भरवसा ठेवण्याच्या लायक नसतात.
विचारांच्या स्थैर्यासोबत कार्यातही स्थैर्य हवे. विचारांच्या स्थैर्य असेल तरच कृतीत स्थैर्य येते. विचार आणि कृती हे जीवनाचे दोन पंख आहेत. एखादे कार्य हातात घेतल्यानंतर त्याचे चांगले फळ मिळाले नाही तर माणूस कार्य सोडून देतो. कार्यावर मुलासारखे प्रेम असेल तरच माणूस कार्य सोडत नाही. मुलगा दुर्बळ असेल तर बापाला दुःख होते तसे कार्य दुर्बळ झाले तर माणसाला दुःख होत असेल आणि त्याने दुप्पट वेगाने कार्य उचलले असेल तरच त्यांचे प्रेम खरे आहे असे मानायचे. भगवंताचे काम जोपर्यंत स्वतःचे वाटत नाही तोपर्यंत कोणतेही मोठे कार्य घडत नाही. शेजाऱ्याच्या मुलांबद्दल जशी दृष्टी असते त्या दृष्टीने माणूस कार्याकडे पाहिल तर कार्याची ही पुष्टी होत नाही व स्वतःचीही पुष्टी होत नाही.
कार्याकडे आत्मीय दृष्टीने पाहिले नाही तर एखाद्या परक्या मुलाला मदत करत आहोत असे त्याला रूप येते. त्याच्या परीक्षेचा निकाल येतच लगेच तुम्ही त्याला विचारता, 'किती मार्क्स मिळाले?' जर चांगले मार्क मिळाले नसतील तर त्याला पटकन सांगून टाकता, 'तू चांगले मार्क मिळवले नाहीस तर फिचे पैसे देणार नाही.'
परंतु तुमचा मुलगा नापास झाला, शिकण्यात हुशार नसला तर तुम्ही त्याच्यासाठी एका शिक्षकाची ट्युशन देखील ठेवता. त्याला अभ्यासाकरता स्वतंत्र खोली देता, घरात त्याला कोणी काही काम सांगितलं तर त्याची बाजू घेऊन सगळ्यांना सांगता की, 'गेल्या वर्षी त्याचा अभ्यास बरोबर झाला नाही तेव्हा त्याला अभ्यास करू द्या त्याला कोणी काम सांगू नका.'
परक्या मुलाने चांगले मार्क मिळवले नाहीत तर तुम्ही त्याला मदत करत नाहीत, तसे कार्याला यश मिळाले नाही तर कार्यावर टीका करता आणि कार्यापासून दूर होता. कार्याचे यश पाहून कार्य करणाऱ्या लोकांचे कार्यावर प्रेम नसते. ते कीर्तीसाठी काम करत असतात.
Comments
Post a Comment