रक्षाबंधनाचे महत्त्व

 रक्षाबंधन

भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिण त्याच्या कपाळाला टिळा लावते. ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्वासाचे दर्शन आहे. बहिण जेव्हा भावाच्या मस्तकाला टिळा लावते त्यावेळी सामान्य भासणार्‍या ह्या क्रियेत दृष्टी परिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली असते. सामान्य दृष्टीने जगाला पहात असलेल्या दोन डोळ्याशिवाय भोगाला विसरून भाव दृष्टीने जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेले आहे. असा संकेत ह्या क्रियेत दिसतो. भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून कामाला भस्म करून टाकला होता. बहिण देखील भावाचा तिसरा नेत्र, बुद्धीचा डोळा उघडून त्याला विकार, वासना इत्यादींना भस्म करायला सुचवीत असते.
     
भावाच्या हातात रक्षा बंधून बहिण त्याच्यापासून केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असेच नाही तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छा करते. त्याच बरोबर बाह्य शत्रूवर व आंतरविकारावर स्वतःच्या भावाने विजय मिळवावा किंवा त्याच्यापासून सुरक्षित रहावे ही भावना देखील त्यात सामावलेली आहे. 
   
वेदांमध्ये देवासुर - संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती असा उल्लेख आहे. अभिमन्यूचे रक्षण इच्छिणाऱ्या कुंती मातेने त्याला राखी बांधली होती; तर स्वतःच्या रक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायुंनाला राखी पाठवली होती. ह्याप्रमाणे राखी मध्ये उभय पक्षाच्या रक्षणाची भावना सामावलेली आहे. परंतु एवढीच त्याची मर्यादा नाही. रक्षाबंधन हे बंधन रक्षणाचे स्मारक आहे. रक्षाबंधन म्हणजे ध्येय- रक्षण. ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे, जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे. तो जीवन विकास साधू शकतो. राखी बांधताना बहिण भावाला बांधते म्हणजे ध्येयाचे रक्षण करायला सुचवते. 
    
'स्त्री कडे विकृत नजरेने न पाहता पवित्र दृष्टी ठेव' हा महान संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या ह्या श्रेष्ठ पर्वाला आपण कुटुंबापुरता मर्यादित बनवला आहे. असले सुंदर प्रेम बंधनाचे, भावबंधनाचे पर्व कुटुंबापुरतेच मर्यादित राखणे योग्य नव्हे. अशा पर्वाचे तर सामाजिकरण आणि वैशवीकरण केले पाहिजे. सख्या भावाबद्दलची पुन्हा ही बहिणीची दृष्टी निर्मळ, प्रेमाने भरलेली असतेच. गरज आहे समाजात स्त्रीकडे पाहणारी विकारी दृष्टी बदलण्याची. सख्खी बहिण सख्या भावाला राखी बांधते त्यापेक्षा समवयस्क दुसरी कुणी बहीण दुसऱ्या भावाला राखी बांधील तर त्यात बुद्धिमत्तेची पराकाष्टा आहे.
      
सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडं पाहण्याचे दृष्टि बदलणे. रक्षाबंधन म्हणजे भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाचे जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे भाऊ - बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा अस्खलित वाहणारा झरा! भाऊ व बहीण परस्पर प्रेरक, पोषक व पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.

    

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन