सागर पूजन - नारळी पौर्णिमेची तयारी.
सागर पूजन
खारा पण 'गोड' समुद्र चंद्राला पाहून वेडा होतो. समुद्र पूजन करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही विचार केला पाहिजे की, ज्याला पाहून वेडेपिसे व्हायला होते अशा संताला आपल्या जीवनात स्थान आहे की नाही? चंद्राला पाहून सागर जसा उचंबळून येतो तसा एखाद्या महापुरुषाचा मुख चंद्रमा पाहून आपल्या हृदय सागरालाही भरती आली पाहिजे. चंद्र ज्याच्याकडून प्रकाश घेतो त्या सूर्याला सागर स्वतःची संपत्ती देतो. सूर्यार्पण केल्याने त्याचा खारेपणा निघून जातो व बरसणारे पावसाचे पाणी सुमधुर लागते. व्यापाऱ्यांनी देखील संत ज्याचे कार्य करीत राहिले आहेत, ज्याच्यापासून प्रकाश व प्रेरणा प्राप्त करतात अशा प्रभूला स्वतःची संपत्ती अर्पण केली पाहिजे. तरच त्यांच्या जीवनातील खारटपणा नाहीसा होईल.
वेदनिष्ठा व वेद रक्षण यांच्या प्रतिज्ञांची आठवण देणारा, ध्येयाचे स्मरण करणारा, भावजीवन पुष्ट बनवणारा, संपत्ती ईश्वरा अर्पण करायला सुचविणारा, श्रावण पौर्णिमेचा हा उत्सव भारतीय जनते करिता गौरवाचे स्थान आहे. वेदनिष्ठेने सृष्टीचे संस्कार स्वास्थ्य टिकविणारा, रक्षाबंधनाने समाजाचे भावबंधन पुष्ट करणारा तसाच सागर पूजेने वैयक्तिक जीवनाच्या महानतेच्या शिखराचे दर्शन करविणारा त्रिवेणी संगमासमान असलेला हा उत्सव आपल्याला पावन करून हीच प्रार्थना!
Comments
Post a Comment