व्यासपौर्णिमा
व्यासपौर्णिमा
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडवणारांचे पूजन होते. संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रितीने अनेक ऋषींनी केले आहे. पण वेदव्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोश 'महाभारत' ग्रंथ दिला. त्यांच्या या ग्रंथाला पाचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली आहे. महाभारताद्वारे त्यांनी सांस्कृतिक विचार दृष्टांता सहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवले. 'मुनिनामप्यहम् व्यास:|' असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची विरोधाय धावली गायली आहे. वेद व्यासांचे जीवन व कवन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी त्यांच्यासाठी 'व्यास' संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या 'पिठा' वरून सांगितले जातात त्या 'पिठा' ला ही आज 'व्यासपीठ' म्हटले जाते. या व्यासपीठावर आरोट होऊन जो निस्वार्थ भावाने स्वतःची उपासना किंवा भक्ती समजून स्व कर्तव्य स्वरूपात संस्कृतीच्या प्रचाराने जीवनवृत्त घेतो, त्याची पूजा या दिवशी करून कृतकृत्य व्हायचे.
व्यासांनाच आपण हिंदू धर्माचा पिता मानू शकतो. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्श कडे अभेद दृष्टीने पाहणाऱ्या अभ्युदय व निश्रेयस या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या, अध्यात्म परायण अशा व्यासांपेक्षा अधिक योग्यतेचा कोणी समाज शास्त्रज्ञ नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की सर्वज्ञ लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले की 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं' आणि व्यासवाणी महाभारताला सारं विश्वस्य म्हटलं आहे.
महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आहेत. कारण त्यांनी समग्र रूपात जीवन जाणलेलं आहे. जीवन हा केवळ प्रकाश नाही किंवा केवळ अंधकार नाही तर जीवन आहे, छाया प्रकाशाचा लपंडाव, भरती ओहोटीचा खेळ आणि सुखदुःखाचा समन्वय महर्षी व्यासांचे म्हणणे आहे की, आपले जीवन तर काळ्या पांढऱ्या तंतुंनी विणलेले वस्त्र आहे. सद्गुण व दुर्गुण जीवनात बरोबरीनेच पाहायला मिळतात.
जीवनाला त्याच्या समग्र रूपात पाहण्याची हिंमत बाळगणारा पवित्र दृष्ट ऋषीच जीवनाचा खरा भाष्यकार किंवा मानवाचा खरा पत दर्शक बनू शकतो. व्यासपीठावर बसणाऱ्या माणसाने काही पथ्य पाळायचे असतात. सर्वात प्रथम गोष्ट ही की, व्यासपीठावरून व्यासांना अमान्य असा एकही विचार बोलता कामा नये आणि म्हणून व्यासपीठावर बसणाऱ्या व्यासाने साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. व्यासपीठावरून कोणाचे अकारण निंदा किंवा स्तुती करता कामा नये. व्यासपीठावर बसणारा माणूस सरस्वतीचा खरा उपासक असला पाहिजे. त्याची वाणी वाङ्मयीन विलास म्हणून नव्हे तर ईश्वर भक्तीच्या रूपात वाहिली पाहिजे. त्याची वाणी सरळ, स्पष्ट, सखोल व समाज उन्नती साधक असली पाहिजे.
Comments
Post a Comment