देवशयनी एकादशी फलित
देवशयनी एकादशी फलित
शिवाय याच्यावरून असेही फलित निघते की, कर्म करा पण अभिमान करू नका. कर्म करताना 'मी' ची समाधी लागू दे. 'अहम' ला गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम न ठेवता तो कर्म म्हणजे जग व्यवहार करीत राहिला.कर्ता ज्यात स्वतःला विसरून जातो, लुप्त होतो, समाधीस्थ होतो ती कृती श्रेष्ठ बनते. ती कृती सुंदर वाटते, कारण तिचा निर्माता तिच्यात एकरूप झालेला आहे. आज आपल्याला कीर्ती व स्तूती किती आवडते! कोणी स्तुती करतो तेव्हा झोपी जाण्याची गोष्ट बाजूलाच राहिली पण कोणी झोपलेला असेल तर त्याच्याजवळ जाऊन त्याला जागून आपण स्व मुखाने स्वतःची स्तुती करू लागतो. असे कोणते विशिष्ट कर्म आपण केलेले असते की, ज्याच्यामुळे आपणास अहंकार होतो? अहंकार युक्त केलेले काम काळाच्या उदरात जळून खाक होते. 'काल: पिबति तद् रसम्|' काळ त्याचा रस पिऊन टाकतो. आपल्या प्राचीन ऋषींमुनीनी वेदांवर स्वतःची नावे लिहिली नाहीत. कारण त्यांना नावाची अभिलाषा किंवा कीर्तीचे कामना नव्हती. आपल्या शिल्पकारांनी ही आपल्या शिल्पावर स्वतःची नावे कोरले नाहीत. म्हणूनच वेद अमर आहेत आणि शिल्पकृती चिरंजीव आहेत. त्यांनी अहमची समाधी लावून कर्म केले. म्हणून आजही ते मानव मात्राला मार्गदर्शन करायला समर्थ आहेत.
जो स्वतःला विसरतो तोच काही ना काही प्राप्त करतो आणि जो प्राप्त करतो तोच काही ना काही देऊन जातो. कार्याच्या दृष्टीने पाहता देखील त्याच कार्याला श्रेष्ठ समजू शकतो की, जेथे महान कार्य दिसते पण कार्यकर्त्याला शोधावे लागते. कार्य कोणी केले हे कळून घेण्यासाठी परिश्रम करावे लागतात. खरा कार्यकर्ता शिखरावर चढून चमकण्यापेक्षा कार्य मंदिराच्या पायात स्वतःला गाडून घेण्यात धन्यता मानतो.ह्या पर्वाकडे पाहण्याची दुसरीही एक दृष्टी असू शकते. आणि ती आहे, विश्वासाची. अविश्वास भय निर्माण करतो आणि भय जागरण भेट देते. विश्वास शांती निर्माण करतो आणि शांती निद्रा भेट देते. सुयोग्य संततीवरील विश्वासाने बाप शांतपणे झोपू शकतो. त्याचप्रमाणे मानवावरील विश्वासाने निश्चिंत बनून भगवान जर झोपेत असेल तर हे मानवाचे परम भाग्य समजले पाहिजे.
सारांश, भगवंताची निद्रा आपल्या वरील त्याच्या विश्वासामुळं असेल तर ती अतिशय उत्तम गोष्ट आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपत असेल तर त्यातही सुवर्ण आहे. परंतु आजच्या दिवशी एवढा दृढ संकल्प तर केलाच पाहिजे की, भगवंताची झोप थकवा, परिश्रम, कंटाळा, त्रास निरसता किंवा एकाकीपणा यामुळे आलेली नसावी; त्यासाठी माझे जीवन व्रतनिष्ठ बनले पाहिजे. म्हणूनच कदाचित चातुर्मासात सर्वात अधिक व्रत येत असावीत. व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो, आणि सृष्टीचे सौंदर्य तसाच सुगंध वाढवित राहिलो तर भगवान माझ्या भरवसावर शांतपणे झोपू शकेल.
भगवंताला असे शांत झोप येण्यासाठी त्याला निश्चित बनविण्यासाठी शक्ती वृत्ती आपल्याला सापडावी अशी आजच्या दिवशी अभिलाषा बाळगली तर ती सार्थक समजली जाईल.
Comments
Post a Comment