देवशयनी एकादशी

देवशयनी एकादशी 

आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्या दिवसापासून चातुर्मास व्रताचा प्रारंभ होतो आणि देवउठी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला त्याची पूर्णहुती होते. 

या दिवसापासून चार महिने प्रभु झोपी जातो. 'मला जे आवडते ते माझ्या प्रभूला आवडते.' या भावानेचं भक्त प्रभूला फुल, अत्तर, प्रसाद इत्यादी वस्तू अर्पण करतो. भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो. भक्ताला उत्तम उत्तम कपडे घालायला आवडतात म्हणून प्रभूलाही सुंदर जरीचे कपडे घालतो. काम करून स्वतः थकून जातो म्हणून स्वतः प्रमाणे त्याचा भगवानही आराम करतो. भगवान झोपतो. कारण, विश्वाचा व्यवहार चालवता चालवता तो थकून जात असेल. म्हणून त्यालाही आराम पाहिजे. त्यानेही चातुर्मासात झोपले पाहिजे असा भक्तीशील हट्ट देखील भक्ताने केलेला असेल. हा भक्तीशील हट्टच देवशयनी या कल्पनेत सौंदर्य व माधुर्य आणतो.

माणूस जसा थकून जातो तसा केव्हा केव्हा कंटाळूनही झोपी जातो. जिद्दी मुलांना कंटाळून 'तुला योग्य वाटते ते कर' असे बोलून पुष्कळ वेळा आई किंवा बाप झोपी जातात; तसे तर भगवंताचे मानवाच्या बाबतीत होत नसेल ना? या दृष्टीने विचार करता भगवंताचे झोपी जाणे हा मानवासाठी आत्मनिरीक्षणाचा विषय बनू शकतो.
प्रवर्तमान विषयात रस नसला तरीही माणूस झोपतो. गंभीर व्याख्यानामध्ये किंवा नीरस चित्रपटात खूप श्रोते आणि प्रेक्षक झोपताना आपण पाहतो. नवीनता किंवा विषयातील आकर्षकतेचा अभाव देखील पुष्कळ वेळा झोपेचे कारण बनू शकतो. त्याच त्याच विषयाची किंवा दृश्याचे वारंवार पुनरावृत्ती, तो विषय किंवा ते दृश्य यांच्या बद्दलची अरुची निर्माण करते. वर्षानुवर्षे यांच्यात कोणत्याही विशिष्ट कार्याची वाढच होत नाही. अशा यांत्रिक जीवनाची निरसता भगवंताला झोपी जायला प्रेरणा देते, हे फारच स्वाभाविक वाटते.

काही वेळा दुसऱ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी माणूस झोपी जातो. भिकारी किंवा फंड वर्गणी जमा करणारे लोक येतात तेव्हा पुष्कळ वेळा माणूस त्यांच्यापासून वाचण्यासाठी जाणून-बुजून झोपी जातो. शंकर कैलासत निघून गेले व विष्णू क्षीरसागरात झोपले ते अशा लोकांपासून वाचण्यासाठी तर नाहीत ना? भगवंताच्या मंदिरात लहान मोठ्या लोकांची जी गर्दी होते ती सर्वच मागणाऱ्यांची असते. भगवंताकडे मागणे यात वाईट काही नाही. मागणाराला भगवान देतो देखील. पण भगवंताला आनंद तर तेव्हाच होतो की, जेव्हा कोणीतरी त्याला निरपेक्ष रित्या भेटायला येतो अथवा स्वतःच्या कर्माची फळे भगवंताच्या चरणावर अर्पण करायला येतो.

या सर्व कल्पनाहून श्रेष्ठ अशी एक कल्पना आहे आणि ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपी जातो. प्रभु जे चार महिने झोपी जातो त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेला तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही. मग चातुर्मासासारख्या अमूल्यकाळात, ज्यावेळी सर्वसृष्टीसाठी जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळेस भगवान झोपतो हे कसं चालेल? त्यामुळे काही 'लोकांना भगवान झोपतो' ही कल्पना जुनी, पुराणातून शोधून काढलेली कथा आहे असे वाटते पण तसे नाही. वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य 16 ही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते. शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. भगवंताच्या या कृपेने लावून निघालेला कृतज्ञ बुद्धीचा मानव देव मंदिरात जाऊन प्रभूचे गुण गाताना थकत नाही. 'माझे वैभव हे तुझ्या कृपेचे फळ आहे.' असे जेव्हा मानव प्रभूला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतो की, 'मला माहित नाही. मी तर चार महिने झोपी गेलो होतो. हे सर्व विचार आणि समृद्धी तुझ्या कामाचे, परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे.' काम करताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहीत नसल्याचा बहाना करून झोपी जाणे याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता दुसरी कोणती असू शकेल का? खऱ्या कर्मयोगाला याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शन कोणते होऊ शकते? भावनेच्या दृष्टीने ही कल्पना जेवढी आद्र वाटते तेवढीच विचारांच्या दृष्टीने ही माधुर्य पूर्ण वाटते.


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन