श्रीकृष्ण शिष्टाई - जेव्हा श्रीकृष्ण पांडवांचा दूत बनून कौरवांकडे जातो तेव्हा श्रीकृष्णाने दाखवलेली आपली शिष्टाई दिसते
श्रीकृष्ण शिष्टाई
भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या वतीने शिष्टाई करायला कौरवांच्या दरबारात गेला तेव्हा दुर्योधनाने खूप आग्रहाने त्याला आपला पाहुणचार नंकरायची विनंती केली होती. दु:शासनाचा महाल सर्वात सुंदर होता. तिथे श्रीकृष्णाला राहण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था करून ठेवण्यात आली होती. त्याचे आगत स्वागत करताना दुर्योधन म्हणाला की, 'तुम्ही शिष्टाई करण्याकरता आला आहात त्यामुळे आमचे अतिथी आहात. पांडव तुमचे सोयरे आहेत तसे आम्ही तुमचे सोयऱ्ये आहोत. आम्ही काही चुकीचे काम करत नाही. आमची प्रजा खूप सुखी आहे. सर्व सुखी राहावेत म्हणून सर्वांना राहण्यासाठी घर आणि पोटापुरते अन्न मिळेल आणि शिक्षण मिळेल याची आम्ही दक्षता घेतो. आम्ही मंदिरे बांधले आहेत, त्यांना वर्षासन पण देतो...' इत्यादी पुष्कळ काही त्याने सांगितले.
कृष्ण जाणत होता की दुर्योधन अतिशय लुच्चा आहे. त्याचा हा सर्व देखावा आहे. शिष्टाईत सांगितलेले तो मानणार नाही. भगवान श्रीकृष्णाचे औपचारिक अगतस्वागत झाले तोपर्यंत ठीक होते. परंतु दुर्योधनाने एवढ्या गोष्टी बोलून दाखवल्या आणि भोजनाचा आग्रह केला तेव्हा कृष्णाने त्याला स्पष्टपणे ऐकवले, 'तुझी गोष्ट खरी आहे पण जो दूत शिष्टाई साठी आलेला असतो त्याने कोणत्याही एका पक्षाकडे जेवायला जाणे हे योग्य नाही. तेव्हा मला आग्रह करू नका.' तरीही दुर्योधनाने आग्रह चालूच ठेवला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट शब्दात सुनावले, 'माणूस कोणाच्या घरी जेवायला जातो? एक तर माणूस ज्याच्या विषयी प्रेम असते त्याच्या घरी जेवायला जातो किंवा ज्याला जेवायला मिळत नाही म्हनून तो दुसऱ्याच्या घरी जेवायला जातो. तुझ्या घरी जेवायला येण्याचे मला काही कारण नाही, कारण माझी परिस्थिती अशी नाही की मला जेवायला मिळत नाही आणि दुसरे असे की तुझे माझ्यावर प्रेम नाही. तर मी तुझ्या घरी जेवायला का यावे?'
Comments
Post a Comment